उरण : उरण नगरपरिषदेच्या हद्दीत सध्या कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ता रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम करण्यात येत आहे. मात्र, ही कामे नागरिकांच्या सोयीसाठी आहेत की खासगी पार्किं ग आणि अवैध विक्रेत्यांसाठी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.दोन वर्षांपासून उरणमध्ये रस्ता रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. एमएमआरडीएच्या माध्यमातून यासाठी ४६ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. निधी उपलब्ध झाल्यावर सुमारे चार किलोमीटर लांबीच्या अंतर्गत रस्ता रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणाची कामे सुरू करण्यात आली. यासाठी शहरातील एनएमएमटीची बससेवा बंद करण्यात आली. ही सेवा अल्पावधीत पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन नगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांनी त्या वेळी दिले होते. मात्र, दोन वर्षे झाली तरी रुंदीकरण, काँक्रीटीकरणाची कामे मार्गी लागलेली नाहीत. ठेकेदाराची मनमानी, त्यावर उरण नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांचा अंकुश नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
रखडलेले रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणामुळे एनएमएमटीच्या बसेस शहराबाहेरच उभ्या राहत आहेत, त्यामुळे बसपर्यंत पोहोचण्यासाठी दहा-पंधरा मिनिटे पायपीट करण्याची पाळी आबालवृद्धांवर आली आहे. तर रिक्षासाठी अतिरिक्त ४० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे ही कामे लवकरात लवकर मार्गी लावावी आणि बससेवा पूर्ववत करावी, अशी माणगी नागरिकांकडून होत आहे. याबाबत यांनी पालिका पदाधिकारी, नगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांच्याशी संवाद साधला आहे. मात्र, त्यांची आश्वासनांवरच बोळवण करण्यात आली आहे.