खोपोलीत वाहतूककोंडीची समस्या
By Admin | Published: March 29, 2017 05:02 AM2017-03-29T05:02:59+5:302017-03-29T05:02:59+5:30
खोपोलीतील वाहतूककोंडीबाबत आजवर वेळोवेळी होणाऱ्या शांतता समितीच्या बैठका, तसेच नगरपालिका सर्वसाधारण
वावोशी : खोपोलीतील वाहतूककोंडीबाबत आजवर वेळोवेळी होणाऱ्या शांतता समितीच्या बैठका, तसेच नगरपालिका सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा घडली आहे. याबाबतीत तात्पुरते उपाय करून नगरपालिका व पोलीस प्रशासन डोळेझाक करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. खोपोली बाजारपेठ, स्टेशन रोड, समाज मंदिर रोड, शास्त्रीनगर, शिळफाटा एसटी डेपो ते इंदिरा गांधी चौक अशा महत्त्वाच्या ठिकाणी दिवसेंदिवस वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनत असल्याने या ठिकाणी नागरिकांना चालणेही कठीण बनले आहे.
अतिक्रमण, फेरीवाले व अनधिकृत वाहने पार्किंगमुळे खोपोलीतील प्रमुख ठिकाणी वाहतुकीचा श्वास कोंडला आहे. दिवसेंदिवस चारचाकी व दुचाकींची संख्या वाढत असल्याने शहरात वाहतूक समस्या सर्वात मोठी समस्या बनली आहे. खोपोलीतील वाहतूक समस्या बिकट होण्यामागे नियमबाह्य वाहने पार्किंग व वाढलेली वाहन संख्या ही प्रमुख कारणे असल्याचे पोलीस व नगरपालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र या समस्येचे मूळ म्हणजे बांधकामांना दिलेली परवानगी, इमारतीच्या पार्किंगच्या जागेतील अनधिकृत गाळे, रस्त्यांवर आलेली अनधिकृत बांधकामे, फेरीवाल्यांवर नसलेले नियंत्रण व खराब रस्ते ही प्रमुख कारणे वाहतूककोंडीला जबाबदार असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
खोपोली बाजारपेठेतील अनेक इमारतीत पार्किंगच्या जागेत अनधिकृत गाळे निर्माण के ल्याने पार्किंगसाठी जागाच राहिली नाही. त्यामुळे इमारतीमधील रहिवासी तसेच बाजारपेठेत दैनंदिन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्यावर आल्याने वाहने चालविण्यासाठी रस्ता अपुरा पडत असल्याने येथे वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. प्रत्येक शांतता समितीच्या बैठकीत व नगरपालिका सभेत वाहतूककोंडीबाबत चर्चा रंगते. त्यानंतर प्रशासन काही दिवसांसाठी कडक अंमलबजावणी करून लोकभावनेचा आदर केल्याचे दाखवते. मात्र काही दिवसांत पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’प्रमाणे समस्या जैसे थे असते. खोपोलीतील नागरिकांना वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे.
वाहतूककोंडी कमी करण्यासाठी नियमित वाहतूक पोलिसांशिवाय अतिरिक्त तीन पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. सम, विषम नियमानुसार, वाहने पार्किंगचा नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पोलीस प्रशासन पूर्ण क्षमता वापरून काम करीत आहे, मात्र समस्या कमी करण्यासाठी खोपोली नगरपालिका व नागरिकांच्या ठोस सहकाऱ्याची गरज आहे.
-एस.एम.शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
खोपोलीत वाहतूक समस्या बिकट होण्यामागे नगरपालिका प्रशासन जबाबदार आहे. फेरीवाले, अतिक्र मणे रोखणे, बाजारपेठ व इतर वाहतूक समस्यांच्या ठिकाणी व्यापारी तसेच रहिवासी इमारतींना स्वत:ची पार्किंग व्यवस्था असणे या बाबी कायम राखण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे. मात्र खोपोली नगरपालिका प्रशासन आर्थिक हितसंबंध असल्याने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
- विजया देवरे - पाटील, सामाजिक कार्यकर्त्या