खांदा वसाहतीत वाहतूक कोंडीची समस्या
By admin | Published: December 22, 2016 06:34 AM2016-12-22T06:34:06+5:302016-12-22T06:34:06+5:30
खांदा वसाहतीमधील नागरिक सध्या वाहतूक कोंडीने हैराण झाले आहेत. शहरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने अस्ताव्यस्त
पनवेल : खांदा वसाहतीमधील नागरिक सध्या वाहतूक कोंडीने हैराण झाले आहेत. शहरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने अस्ताव्यस्त पार्क के ली जात असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या बाजूलाच वाहतूक कोंडी होत असून छोट्या-मोठ्या अपघातांना आमंत्रण मिळत आहे.
मध्यमवर्गीयांची वस्ती म्हणून सुपरिचित असलेल्या खांदा वसाहतीला वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले आहे. परिसरातील सेक्टर १०, ८, ९, १३ मध्ये तर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सिडकोने जवळपास २५ वर्षांपूर्वी येथील वसाहतींची उभारणी केली. परंतु खांदा कॉलनी शहरात लाखोंची वस्ती आहे. आजही या वसाहतीमध्ये मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव आहे. त्यातच शहरात हॉटेल, हॉस्पिटल, शाळा, कॉलेज यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील वाहनांची संख्या देखील प्रचंड आहे. मात्र असे असूनही खांदा कॉलनी शहरात वाहतूक पोलीस फिरकत नसल्याचे रहिवाशांंचे म्हणणे आहे. शिवाजी चौकात देखील वाहतूक कोंडी होते. वाहतूक पोलीस तैनात केले तर बेशिस्त वाहन चालवणाऱ्यांना चाप बसेल व खांदा वसाहतीतील वाहतूक कोंडीची समस्या सुटेल, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
शनिवारी पोलीस स्टेशनच्या बाजूलाच एका महिलेच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात ही महिला थोडक्यात बचावली. मात्र ही महिला जखमी झाली. खांदा वसाहत सेक्टर ८ मध्ये खांदेश्वर पोलीस स्टेशन आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची व नागरिकांची वर्दळ असते. विविध तक्र ारी दाखल करण्यासाठी नागरिक येत असतात, तसेच शेजारीच हॉटेल असल्यामुळे रस्त्यावर गाड्या पार्क केल्या जातात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अस्ताव्यस्त चारचाकी व दुचाकी गाड्या पार्क करत असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अस्ताव्यस्त वाहने उभी करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे.