नवी मुंबई : शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या खोदकामांमध्ये नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदल्यानंतर ते मातीने बुजवण्यात आले आहेत. यामुळे त्यावरून वाहतुकीला अडथळा होत असल्याने उर्वरित अपुऱ्या मार्गातूनच दोन्ही दिशेची वाहने चालत असून, त्यामध्ये अपघाताचा धोका उद्भवत आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर पालिकेकडून शहरात मोठ्या प्रमाणात कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामध्ये गटार दुरुस्ती, पदपथ दुरुस्ती, रेलिंग बसवणे या कामांचा समावेश आहे. अशातच काही ठिकाणी भूमिगत विद्युत वाहिन्या बदलण्याचे अथवा इतर कामांसाठी रस्त्याची खोदकामे सुरू आहेत. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी दोन ते तीन महिन्यांपूर्वीच रस्त्याच्या डांबरीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यानंतर पदपथ, गटारे, रेलिंग तसेच इतर खोदकामे केली जात आहेत. यामुळे रस्त्यांच्या डांबरीकरणावर झालेला खर्च व्यर्थ ठरून पुन्हा त्या ठिकाणी डांबरीकरणाची गरज निर्माण झाली आहे. तर अशा प्रकारांमधून रस्त्यांच्या खोदकामात अथवा इतर कामांमध्ये प्रशासन व संबंधित विभागांच्या नियोजनाचा अभाव असल्याचे उघड दिसून येत आहे. तसेच रस्त्यांची दुबार खोदकामे झाल्यानंतर अद्यापही बºयाच ठिकाणी केवळ माती व खडीचा भराव टाकून रस्ते बुजवण्यात आले आहेत. त्यामध्ये रस्त्याची पूर्णपणे एक लेन व्यापली गेली आहे. त्यावरून चारचाकी अथवा दुचाकी चालवणे धोक्याचे ठरत आहे. यामुळे उर्वरित एका लेनमधूनच दोन्ही दिशेची वाहतूक सुरू आहे.
यामध्ये सकाळ व संध्याकाळच्या वेळी अशा ठिकाणी मोठी वाहतूककोंडी होत आहे. त्याचा नाहक त्रास सर्वसामान्यांसह वाहतूक पोलिसांना सहन करावा लागत आहे. कोपरखैरणे रेल्वे स्थानक ते घणसोली रेल्वे स्थानक दरम्यानच्या मार्गावरही हे दृश्य पाहायला मिळत आहे. त्याशिवाय नोड अंतर्गतच रस्त्यांवरही खोदकामे झाल्यानंतर त्यावर डांबरीकरण न करता मातीचा भराव टाकून खोदकामे तात्पुरती बुजवल्याचे दिसून येत आहे. यामुळे हवेसोबत हे धूलिकण परिसरात पसरत असल्याने तिथल्या हवेच्या प्रदूषणातही भर पडत आहे. तर एखादे मोठे वाहन त्या ठिकाणावरून वेगात गेल्यास उडणारी धूळ दुचाकीस्वारांच्या डोळ्यात जाऊन अपघातांना कारणीभूत ठरत आहे.तर एकदा रस्त्याचे डांबरीकरण केल्यानंतर पुन्हा काही दिवसांतच झालेल्या खोदकामामुळे त्या ठिकाणी पुन्हा डांबरीकरणावर खर्च करावा लागणार आहे. यामध्ये निधीचा अपव्यय होत असल्याचा संताप सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.नागरिकांची होतेय गैरसोयरस्त्यांचे खोदकाम झाल्यानंतर डांबरीकरणावेळी पॅच बुजवताना रस्ता समांतर करण्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे एकाच रस्त्यावर जागोजागी चढउतार तयार होत आहेत. यामध्ये दुचाकीस्वारांच्या अपघाताची शक्यता निर्माण होत आहे.रस्त्यांचे डांबरीकरण करण्यापूर्वीच तिथली आवश्यक कामे उरकली जाणे आवश्यक आहे. परंतु संबंधित प्रशासनांमध्ये नियोजनाचा अभाव असल्याचा परिणाम विकासकामांवर होत आहे. त्याचा नाहक त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे.