प्रक्रिया केलेल्या पाण्याचे मार्केटिंग
By admin | Published: August 24, 2015 02:40 AM2015-08-24T02:40:02+5:302015-08-24T02:40:02+5:30
सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केलेल्या पाण्याची विक्री करण्यास महापालिका प्रशासनाला ्रपूर्णपणे अपयश आले आहे. त्यामुळे प्रक्रिया केलेले १९० एमएलडी
नवी मुंबई : सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केलेल्या पाण्याची विक्री करण्यास महापालिका प्रशासनाला ्रपूर्णपणे अपयश आले आहे. त्यामुळे प्रक्रिया केलेले १९० एमएलडी पाणी समुद्रात सोडावे लागत आहे. भविष्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी वाया जाणाऱ्या या पाण्याच्या विक्रीसाठी नव्याने मार्केटिंग करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्या दृष्टीने चाचपणीही सुरू करण्यात आली आहे.
पावसाने दडी मारल्याने राज्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. मोठ्या शहरांसमोर पिण्याच्या पाण्याचा आतापासूनच गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नवी मुंबईकर मात्र याबाबतीत सुदैवी ठरले आहेत. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात पुढील सात महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुढील उन्हाळ्यात शहरवासीयांवर पाणीबाणी लादली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज असल्याचे जाणकारांचे मत
आहे.
सुमारे ५०० कोटी रुपये खर्च करून महापालिकेने अत्याधुनिक दर्जाचे सहा सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू केले आहे. या केंद्रातून दिवसाला प्रक्रिया केलेले २०० एमएलडी शुद्ध पाणी तयार होते. या पाण्याचा वापर उद्याने, बांधकाम आणि इतर प्रयोजनासाठी करता येऊ शकतो.
विशेष म्हणजे या पाण्याच्या विक्रीतून वर्षाला १५० कोटी रुपयांचा महसूल मिळेल, असे महापालिकेने गृहीत धरले होते. मात्र गेल्या पाच वर्षांत या पाण्याच्या खरेदीसाठी कोणीही पुढे आलेले नाही. किंबहुना त्याच्या मार्केटिंगसाठी प्रशासनाकडून पुरेसे प्रयत्न झालेले नाही. त्यामुळे या केंद्रांत तयार होणारे पाणी
खाडीत सोडून देण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे. परंतु भविष्यात ओढावणाऱ्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी वाया जाणाऱ्या या पाण्याचे नियोजन करणे गरजेचे झाले आहे. त्यानुसार प्रशासनाने चाचपणी सुरू केली आहे. मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रांत तयार होणाऱ्या एकूण पाण्यापैकी सध्या १० एमएलडी पाण्याचा वापर केला जात आहे.
रस्त्याच्या दुभाजकावरील झाडांसाठी महापालिका या पाण्याचा वापर करते. तर काही गृहनिर्माण सोसायट्या उद्याने आणि साफसफाईसाठी या पाण्याचा वापर करतात. उर्वरित १९० एमएलडी पाण्याचा सुध्दा अशाच प्रकारे वापर व्हावा, अशी प्रशासनाची योजना आहे. त्यानुसार या पाण्याच्या विक्रीसाठी येत्या काळात जोरदार मार्केटिंग करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. (प्रतिनिधी)