नवी मुंबई विमानतळाला प्रक्रियायुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2022 09:07 AM2022-05-12T09:07:46+5:302022-05-12T09:07:55+5:30

चार टप्प्यांत हे विमानतळ पूर्ण केले जाणार असून,  सध्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर आहे.

Processed water to Navi Mumbai Airport | नवी मुंबई विमानतळाला प्रक्रियायुक्त पाणी

नवी मुंबई विमानतळाला प्रक्रियायुक्त पाणी

googlenewsNext

- कमलाकर कांबळे
 लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी मुंबई :  सिडकोच्या दक्षिण नवी मुंबईचा वेगाने विस्तार होत आहे. या विभागात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारले जात आहेत. त्यामुळे पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी २१.८२ एमएलडी पाणी लागणार असल्याचा अंदाज पर्यावरणविषयक अहवालात व्यक्त केला आहे. यातील १०.६१ एमएलडी पिण्यायोग्य, तर उर्वरित ११.२१ एमएलडी पुनर्प्रक्रिया केलेले असणार असल्याने त्यासाठी तीन एसटीपी प्लॅन्ट प्रस्तावित केले आहेत.

चार टप्प्यांत हे विमानतळ पूर्ण केले जाणार असून,  सध्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर आहे. यासाठी डिसेंबर २०२४ ची डेडलाइन आहे, तर तिसरा टप्पा २०२८ मध्ये आणि चौथा टप्पा २०३२ मध्ये पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने (एनएमआयए) एन्व्हायर्नमेंट  इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल तयार केला आहे. त्यानुसार विमानतळाचा अंतिम टप्पा पूर्ण झाल्यानंतर २१.८२ एमएलडी पाण्याची गरज भासणार असून, यापैकी १०.६१ एमएलडी पिण्यायोग्य, तर उर्वरित  ११.२१ एमएलडी पुनर्प्रक्रिया केलेले असेल, असे नमूद केले आहे.  पिण्यायोग्य पाण्याची पूर्तता करण्याची जबाबदारी सिडकोवर साेपविली आहे, तर प्रक्रिया केलेले ११.२१ एमएलडी पाणी स्वच्छतागृहे, उद्याने, साफसफाईसाठी वापरण्यात येणार आहे. त्यासाठी तीन एसटीपी प्लॅन्ट प्रस्तावित केले असले तरी, ते कागदावरच आहेत. 
नैना तसेच प्रस्तावित विविध गृहप्रकल्पांमुळे भविष्यात पाण्याची गरज वाढणार असून २०५० पर्यंतच्या लोकसंख्येचा ढोबळ अंदाज बांधून नियोजन करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. 

    सिडकोने पाण्यासाठी २०५० पर्यंतचे नियोजन केले आहे. त्या वेळच्या लोकसंख्येनुसार या संपूर्ण क्षेत्रासाठी १२७५ एमएलडी पाण्याची गरज लागेल, असा ढोबळ अंदाज आहे. 
     पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत म्हणून सिडको बाळगंगा धरणाकडे पाहत असून, त्याचे काम तांत्रिक अडचणीमुळे थांबले आहे. असे असले तरी, पुढील पाच- सहा वर्षांत ते पूर्ण करण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे. ते पूर्ण केल्यास ३५० एमएलडी पाणी मिळेल, असा अंदाज आहे. 
     सिडकोने अलीकडेच राज्य सरकारकडून कोंढाणे धरण हस्तांतरित करून घेतले असून, त्यातून नैना क्षेत्राची पाण्याची गरज भागणार आहे. 
    २०२८ पर्यंत त्याचे काम पूर्ण करण्याचा निर्धार असला तरी, सध्या केवळ कागदी घोडेच नाचविले जात असल्याने पाणीपुरवठ्याची डोकेदुखी सिडकोस सताविणार आहे.

Web Title: Processed water to Navi Mumbai Airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.