अलिबाग : पावसाची संततधार, ढोल-ताशांचा गजर आणि टाळ मृदुंगाच्या तालावर दहा दिवसांच्या बाप्पाला मोठ्या दिमाखात गुरुवारी निरोप देण्यात आला. यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील वैशिष्ट्य म्हणजे डीजे वाजवून मिरवणूक काढणाऱ्यांची संख्या रोडावली होती. रायगड पोलिसांनी याबाबत विविध सार्वजनिक मंडळांना आवाहन केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद लाभल्याने डीजेचा दणदणाटांचा कानठळ््या बसणारा आवाज काहीसा निरवल्याचे जाणवले.सायंकाळी पाच वाजल्यापासून गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. पावसाची संततधार आकाशातून होत असतानाही गणेशभक्तांचा उत्साह प्रचंड होता. सायंकाळनंतर त्यांच्या उत्साहाला चांगलेच उधाण आले. सार्वजनिक गणेशात्सव मंडळांसह खासगी गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांनी यंदा डीजे वाजविले नाहीत. ढोल-ताशा, टाळ मृदुंगाच्या गजराने अवघा आसमंत दुमदुमून गेला. भक्तिमय वातावरणात गणेशभक्त चांगलेच तल्लीन झाले होते. काही खासगी आणि सार्वजनिक मंडळांनी कमी आवाजातील स्पीकरचा वापर करीत मिरवणूक काढली. त्यावेळी आबालवृध्दांनी त्यावर चांगलाच ठेका धरल्याचे दिसून आले.पर्यावरणाच्या रक्षणासाठी बहुतांश गणेश मंडळांसह खासगी गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांनी निर्माल्य समुद्राच्या पाण्यात टाकले नाही. निर्माल्य घेण्यासाठी अलिबाग नगर पालिकेच्या वतीने कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्याचप्रमाणे खोल समुद्रात गणरायाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी बोटीची व्यवस्थाही नगर पालिकेने केल्याचे दिसून आले. वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी गर्दी होणारी ठिकाणे ओळखून तेथून मिरवणूक वाहनांव्यतिरिक्त कोणत्याही वाहनांना विसर्जन ठिकाणी सोडले नाही. प्रत्येक ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते. (प्रतिनिधी)
मिरवणुकीत ढोल-ताशांना पसंती
By admin | Published: September 17, 2016 2:10 AM