संजय करडे / नांदगाव/मुरुडमुरुड तालुक्यापासून १४ किलोमीटर अंतरावर फणसाड वन्य जीव अभयारण्य आहे. सुमारे ५४ चौरस किलोमीटर अंतरावर याचा विस्तार असून मुरु ड व रोहा या दोन तालुक्यांची हद्द याला लागून आहे. या अभयारण्यात सांबर, बिबटे, भेकरे, रानडुक्कर, वानर, माकड, पिसोरी, रानमांजर असे अनेक प्राणी त्याच प्रकारे असंख्य पक्ष्यांच्या जाती येथे आढळून येतात. या प्राण्यांसाठी नैसर्गिक जलसाठे हा एकमेव पर्याय आपली तहान भागविण्यासाठी उपलब्ध आहे, मात्र सध्या मे महिना सुरू असून उन्हाची काहिली वाढत आहे. याचा विचार करून आणि उन्हाळ्यात कोरडे पडणारे जलसाठे लक्षात घेऊन वन विभागाने फणसाड अभयारण्यात प्राणी, पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी दोन तलावांची निर्मिती केली असल्याची माहिती फणसाड अभयारण्याचे वनक्षेत्रपाल सुलेमान तडवी यांनी दिली.वन्यजीव प्राण्यांना फणसाड अभयारण्यात कोणतीही पाणीटंचाई नसल्याचा निर्वाळा यावेळी तडवी यांनी दिला. सध्या मुरु ड तालुक्याचे तापमान ३६ ते ३८ डिग्री सेल्सियसमध्ये असून कडक उन्हात प्राणी, पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी २०१७ च्या सुरुवातीला बशी तलाव निर्मिती करण्यात आला आहे. या तलावाला बशीचा आकार असून सहा बाय सहाचा आकार देण्यात आला आहे. या तलावात मुबलक पाणी असल्याचे तडवी यांनी सांगितले. गर्द झाडीच्या बाजूला हा तलाव बांधण्यात आला असून दर दोन दिवस आड या तलावात पीक अप गाडीमधून पाणी टाकण्यात येते. सन २०१६ च्या अखेरीस वन तलाव बांधण्यात आला आहे. या तलावाचे काम शासकीय निधीमधून करण्यात आले आहे. या तलावास झरे लागले असून येथे पाण्याचा मुबलक साठा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या तलावावर पाणी पिण्यासाठी सांबर, माकडे येतात हे आमच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले आहे. तसेच या व्यतिरिक्त फणसाड अभयारण्यात २७ पाण्याचे स्रोत उपलब्ध असल्याचे तडवी यांनी सांगितले. सावरट तलाव व चिखल गाण येथे बारा महिने पाण्याचा साठा उपलब्ध असतो.तीन बोरिंगचा प्रस्ताव तयार येणाऱ्या वर्षात फणसाड अभयारण्यात पशू-पक्ष्यांसाठी तीन बोरिंगचा प्रस्ताव तयार करणार असल्याचे वनक्षेत्रपाल सुलेमान तडवी यांनी सांगितले. फणसाड अभयारण्यातील पशू-पक्षी हे अभयारण्य सोडून इतर अन्य कोणत्याही जागी पाणी पिण्यास जात नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. येथे वन्य जीव प्राण्यांना पाणीटंचाई नसून येथे मुबलक पाणी असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. शनिवार व रविवार या दिवशी पुणे व मुंबई येथील असंख्य पर्यटक येथे येतात. मुरु ड नगरपरिषदेने येणाऱ्या पर्यटकांना फणसाड अभयारण्य दर्शन अशी बससेवा उपलब्ध करून दिली तर येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची संख्या वाढेल असा आशावाद तडवी यांनी व्यक्त केला आहे.
फणसाड अभयारण्यात दोन तलावांची निर्मिती
By admin | Published: May 05, 2017 6:12 AM