व्यावसायिक गाळे, झोपड्या जमीनदोस्त, दोन दशकानंतर झाली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 11:37 PM2019-05-29T23:37:13+5:302019-05-29T23:37:22+5:30

पनवेल शहरातील एसटी आगारासमोरील व्यावसायिक गाळे तब्बल दोन दशकांनंतर अखेर पनवेल महापालिकेने जमीनदोस्त केले.

Professional lanes, slums of slaughter, action taken after two decades | व्यावसायिक गाळे, झोपड्या जमीनदोस्त, दोन दशकानंतर झाली कारवाई

व्यावसायिक गाळे, झोपड्या जमीनदोस्त, दोन दशकानंतर झाली कारवाई

googlenewsNext

पनवेल : पनवेल शहरातील एसटी आगारासमोरील व्यावसायिक गाळे तब्बल दोन दशकांनंतर अखेर पनवेल महापालिकेने जमीनदोस्त केले. नगरपरिषद अस्तित्वात असतानाही या ठिकाणी अनेक वेळा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आल्या होत्या. मात्र, प्रत्येक वेळी राजकारण आडवे येत असल्याने कारवाई स्थगित करण्यात येत होती. बुधवारी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पालिका व पोलीस प्रशासनाच्या मोठ्या फौजफाट्यासह येथील झोपड्या हटविण्यात आल्या.
पनवेल शहरातून गेलेल्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलाच्या दोन मार्गिका येथील लक्ष्मी वसाहत झोपडपट्टीमुळे रखडल्या आहेत. दोन आठवडाभरापूर्वी एमएसआरडीसीने येथील झोपडीधारकांना घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, येथील रहिवाशांनी घरे रिकामी करण्यास विरोध दर्शविला. यासंदर्भात आयुक्तांनी मध्यस्थीची भूमिका घेत झोपडीधारकांचे ट्रान्झिट कॅम्पमध्ये पुनर्वसन केल्याशिवाय झोपड्यांना हात लावणार नाही, अशी भूमिका घेतली. मात्र, झोपड्यांच्या नावाखाली सुरू असलेले व्यावसायिक गाळ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नसल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले होते. बुधवारी पनवेल रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता व आगारासमोरील मार्ग मोकळा करण्यात आला. कारवाईसाठी वेगवेगळी पाच पथके तयार करून टप्प्याटप्प्याने झोपड्या तोडण्यात आल्या. कारवाईला विरोध करणाऱ्यांना या वेळी ताब्यात घेण्यात आले.
शहराच्या प्रवेशद्वाराजवळ मागील ५० वर्षांपासून सुरू असलेले हॉटेल सुभाष पंजाबही या वेळी जमीनदोस्त करण्यात आले. या ठिकाणी सुरू असलेली कारवाई थांबविण्यासाठी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आयुक्त कारवाईवर ठाम असल्याने कारवाई सुरूच ठेवण्यात आली. या ठिकाणी सुमारे १३६ व्यावसायिक गाळे आहेत. झोपड्यांच्या नावाखाली या गाळ्यांमध्ये दुकाने थाटण्यात आली होती.
पनवेल महापालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. आजतागायत झोपडपट्टींच्या आडून पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू आहे. मागील दहा वर्षांपासून झोपड्यांमुळे पंचायत समितीच्या इमारतीचे कामही रखडले होते. कारवाई वेळी १०० पेक्षा जास्त पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी उपस्थित होता. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त अशोक दुधे, पालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर, पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते आदीसह मोठ्या प्रमाणात पालिका कर्मचारी, पोलीस उपस्थित होते.
>कारवाईदरम्यान चाकू हल्ल्याचा प्रयत्न
पनवेल एसटी स्टॅण्डसमोर कारवाई सुरू असताना एक माथेफिरू चाकू घेऊन कारवाईच्या ठिकाणी धावत आला होता. महिला पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते यांना या संदर्भात माहिती दिली.पोलिसांनी माथेफिरूला अटकाव करीत त्याच्याकडून चाकू हिसकावला. या घटनेमुळे घटनास्थळी खळबळ उडाली. किशोर मोकल असे माथेफिरू तरुणाचे नाव आहे. वेळेत संबंधिताना अटकाव केल्याने पुढील दुर्घटना टळली.
>कारवाईदरम्यान झोपडीधारकांनी सहकार्य केले. झोपडीधारकांबद्दल सहानुभूती आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्यांना घरे मिळणार आहेत. तोपर्यंत आम्ही त्यांचे पुनर्वसन करणार आहोत. मात्र, या झोपडींच्या आडून सुरू असलेल्या व्यावसायिक गाळेधारकांना कदापि अभय दिले जाणार नाही.
- गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल
>शहरातून पनवेल रेल्वेस्थानकाकडे जाणारी वाहतूककोंडी ही प्रवाशांसाठी नित्याचीच होती. या ठिकाणच्या झोपडीदेखील कारवाईत हटविण्यात आल्या. या ठिकाणी रस्त्याचे काम पालिकेने सुरू केले आहे.
>महामार्गावरील वाहतूक काही काळ बंद
कळंबोली : झोपडपट्टीतील व्यावसायिक दुकानांवर बुधवारी महापालिकेने मोठ्या फौजफाट्यासह कारवाई केली. यामध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून पनवेल शहरातून जाणाºया मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्गावरील वाहतूक काही वेळ थांबवण्यात आली होती. ती वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गाने वळवली. त्यामुळे वाहनचालकांची काही प्रमाणात गैरसोय झाली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ च्या बाजूला झोपडपट्ट्या आहेत. त्या हटविण्यासाठी महापालिकेचे दोनशे कर्मचारी, मोठा पोलीस फौजफाटा होता. त्यामुळे पनवेल बस स्टँडच्या समोर वाहतूककोंडी होऊ नये म्हणून पनवेल शहर वाहतूक शाखेने नवीन पनवेल सिग्नलपासून ते शिवशंभू नाका दरम्यान दोन्ही बाजूने वाहतूक बंद केली होती. मात्र, उड्डाणपुलावरून वाहनांची वर्दळ सुरू होती.

Web Title: Professional lanes, slums of slaughter, action taken after two decades

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.