रिलायन्स वसाहतीचा होतोय व्यावसायिक वापर

By admin | Published: June 30, 2017 03:03 AM2017-06-30T03:03:57+5:302017-06-30T03:03:57+5:30

कोपरखैरणेमधील रिलायन्स वसाहतीला मुख्य जलवाहिनीवरून पाणीपुरवठा करण्यात आला आहे. या वसाहतीचा वापर हॉटेलप्रमाणे केला जात आहे.

Professional use of Reliance Colony | रिलायन्स वसाहतीचा होतोय व्यावसायिक वापर

रिलायन्स वसाहतीचा होतोय व्यावसायिक वापर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोपरखैरणेमधील रिलायन्स वसाहतीला मुख्य जलवाहिनीवरून पाणीपुरवठा करण्यात आला आहे. या वसाहतीचा वापर हॉटेलप्रमाणे केला जात आहे. मुख्य जलवाहिनीवरून करण्यात आलेला पाणीपुरवठा खंडित करावा व व्यावसायिक दराने बिल आकारण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक देवीदास हांडे-पाटील यांनी केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका मुख्य जलवाहिनीवरून कोणालाही नळजोडणी देत नाही; परंतु कोपरखैरणेमधील रिलायन्स वसाहतीला मुख्य जलवाहिनीतून पाणीपुरवठा करण्यात आल्याचा प्रकार हांडे-पाटील यांनी निदर्शनास आणला होता. पालिका प्रशासनाने याविषयी चौकशी केली असताना, ब्ल्यू डायमंड चौकापासून मुख्य जलवाहिनीवरून पाणी देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये या विषयावर त्यांनी पुन्हा लक्ष केंद्रित केले. कोपरखैरणेमधील सर्वसामान्य नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक दिवसांपासून कमी दाबाने व मर्यादित वेळेतच पाणीपुरवठा होत आहे; परंतु रिलायन्स वसाहतीला मात्र २४ तास पूर्ण क्षमतेने पाणी पुरविण्यात येत असून, हा सामान्य नागरिकांवर अन्याय होत आहे.
रिलायन्स वसाहतीमध्ये निवासी दराने पाणीपुरवठा केला जात आहे. वास्तविक या वसाहतीचा वापर हॉटेलप्रमाणे केला जात आहे. हॉटेलप्रमाणे रूम भाडेतत्त्वावर दिल्या जात आहेत. पूर्णपणे व्यावसायिक वापर होत असल्याने त्यांना पाणीही व्यावसायिक दराने देण्यात यावे, अशी मागणी हांडे-पाटील यांनी केली आहे.
महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनीही रिलायन्सला मुख्य जलवाहिनीवरून पाणीपुरवठा करण्यात आल्याचे मान्य केले. वसाहतीमध्ये जास्त पाणीपुरवठा होत असून, तो नियंत्रणात आणण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली. यावर सर्वच नगरसेवकांनी रिलायन्सला वेगळा नियम व सामान्य नागरिकांसाठी वेगळा नियम ठेवू नये, नियमाप्रमाणेच सर्वांना पाणी देण्यात यावे व नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

Web Title: Professional use of Reliance Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.