विज्ञान, तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीसह उद्योगांना गती- केंद्रीय खाद्य उद्योगमंत्र्यांचं प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 11:37 PM2018-10-25T23:37:30+5:302018-10-25T23:37:49+5:30
भारतातील शेतकरी आता पारंपरिक पद्धतीने शेती न करता तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा आधार घेत शेती करीत आहेत.
नवी मुंबई : भारतातील शेतकरी आता पारंपरिक पद्धतीने शेती न करता तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा आधार घेत शेती करीत आहेत. यामुळे शेती उत्पादनात वाढ होण्याबरोबरच शेती आणि त्यावर आधारित सर्व उद्योगांचा विकास झाला आहे. तंत्रज्ञानामुळे भारतातील सर्वच क्षेत्रातील उद्योग आणि व्यवसायाला गती मिळत असून, भारताच्या दृष्टीने क्र ांतिकारी बदल असल्याचे प्रतिपादन केंद्रीय खाद्य प्रसंस्कारण उद्योगमंत्री हरिसमरत कौर बादल यांनी केले. १९ व्या जागतिक फूड परिषदेचा उद्घाटन सोहळा बुधवार, २४ आॅक्टोबर रोजी वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात पार पडला, त्या वेळी त्या बोलत होत्या.
भारताची लोकसंख्या युरोपच्या लोकसंख्येपेक्षा दुप्पट असतानाही आपल्या देशातील सर्व लोकांची अन्नाची गरज भागविण्याची क्षमता आपल्या शेतकऱ्यांमध्ये असल्याचे सांगत, दूध उत्पादनात भारताचा जगात पहिला क्र मांक लागत असून फळे, भाज्या, मांस, मासे उत्पादनात भारताचा दुसरा क्र मांक लागत आल्याचे मंत्री हरिसमरत कौर बादल यांनी सांगितले. भारताच्या शेतकºयांची अन्नधान्य उत्पादनाची खूप मोठी क्षमता आहे; परंतु देशातील अनेक लोकांना पोटभर अन्न मिळत नसून, हे दुर्भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्नधान्य साठविण्यासाठी लागणारी साधन सामुग्री, वाहतूक अशा अनेक गोष्टींची असलेली कमतरता यामुळेच अन्नाचा अपव्यय होत असल्याचे त्यांनी सांगितले. इतर देशांकडून असे तंत्रज्ञान शिकण्याचा प्रयत्न केला तर अन्नाचा अपव्यय होणार नाही आणि भारत देश अन्नधान्याची फॅक्ट्री म्हणून नावारूपाला येईल, असे त्या म्हणाल्या. या उद्घाटन समारंभाला आययूओपीएसटीचे अध्यक्ष डॉ. डित्रीच नॉर, आययूएफओएसटी २०१८ चे संयोजक डॉ. व्ही. प्रकाश, जगदीश पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.