पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगती पत्रकावर राहणार ‘वर्गोन्नत’ असा उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 01:01 AM2021-05-07T01:01:14+5:302021-05-07T01:01:36+5:30
कोरोनामुळे शासनाचा निर्णय : नवी मुंबईत विद्यार्थ्यांना दिलासा
योगेश पिंगळे
नवी मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२० -२१ या शैक्षणिक वर्षात प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्या नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू होते. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात कोविड १९ अपवादात्मक परिस्थितीमुळे पहिली ते आठवीच्या बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार वर्गोन्नतबाबत मार्गदर्शक सूचना असलेला निर्णय शासनाने जाहीर केला असून पहिली ते चैथीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुस्तकावर ‘वर्गोन्नत’ असा उल्लेख करण्यात येणार आहे.
कोरोनाचा संसर्ग कायम असल्याने गेल्या शैक्षणिक वर्षात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शाळा एकही दिवस प्रत्यक्षात भरली नाही. गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शासनाने थेट आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचा आदेश काढल्यावर ९ वी व ११ वीच्या विद्यार्थ्यांच्याबाबतीत देखील हाच निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणार असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रगतिपुस्तकावर काय नोंद असेल याची विद्यार्थ्यांसह पालकांनादेखील उत्सुकता लागली होती. परंतु शिक्षण विभागाने याबाबत लेखी आदेश काढून इतर कोणताही शेरा देण्याऐवजी आरटीई कायद्यानुसार ‘वर्गोन्नत’ शेरा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिक्षकांनीदेखील सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
प्रगतिपत्रकच बदलणार
कोरोनामुळे शाळा प्रत्यक्षात सुरू न झाल्याने यावर्षी विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रावर ‘वर्गोन्नत’ असा उल्लेख राहणार आहे त्यामुळे यावर्षी उपस्थित दिवस, उंची, वजन, श्रेणी हा कोणताही उल्लेख असणार नाही
नवी मुंबई शहरातील महापालिका, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या -
शाळा सुरू नसल्याने गेले वर्षभर शाळा, नवीन वर्ग पाहिलाच नाही. शाळा लवकर सुरू झाल्या पाहिजेत, घरी अभ्यास करून कंटाळा आला आहे.
- साई शेवाळे (विद्यार्थी)
शाळेत मित्रांसोबत जाऊन शिकण्याची खूप इच्छा होती. परंतु शाळा सुरू झाल्याच नाहीत. ऑनलाइन शिक्षणाच्या निमित्ताने मित्रांना पाहू शकलो, परंतु प्रत्यक्षात भेट झाली नाही. आता शाळेतील नवीन वर्गात प्रत्यक्ष जाऊन शिक्षण घेण्याची खूप इच्छा आहेत.
- गायत्री पिंगळे (विद्यार्थिनी)
कोरोनामुळे शाळा सुरू झाल्या नाहीत परंतु ऑनलाइन अभ्यास सुरू होता. ऑनलाइन अभ्यासापेक्षा शाळा सुरू असलेली चांगली. शाळा सुरू नसल्याने मित्रमैत्रिणीदेखील भेटले नाहीत. घरी फार कंटाळा आला आहे.
- विराज पाटील (विद्यार्थी)
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मागील शैक्षणिक वर्षात प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना वर्गोन्नत शेरा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.
- योगेश कडुसकर, शिक्षणाधिकारी, न. मुं.म.पा.