विशेष प्रतिनिधी/ लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : जिल्ह्यातील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. त्याचा विकास होण्याकरिता त्यास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने रायगड जिल्हा परिषदेने शेतकऱ्यांचा हा सत्कार सोहळा ठेवला आहे. जेणेकरून इतर शेतकऱ्यांना या प्रगतशील शेतकऱ्यांचा आदर्श कायम राहिला पाहिजे. कृषी विभागामार्फत ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे मेळावे, शिबिर भरविले जातात. या कार्यक्रमांमध्ये प्रगतशील शेतकऱ्यांना संधी देण्याचे काम केले पाहिजे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी केले.हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी जिल्हा परिषदेच्या वतीने कृषी दिन साजरा करण्यात आला. कृषी दिनाचे औचित्य साधून जि. प.च्या ना. ना. पाटील सभागृहात आयोजित कार्यक्रमात अदिती तटकरे बोलत होत्या. या वेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील, महिला व बालकल्याण सभापती उमा मुंढे, शिक्षण व आरोग्य सभापती नरेश पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्तात्रेय पाटील, अलिबाग पंचायत समिती सभापती प्रिया वेटकोळी, उपसभापती प्रकाश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, जिल्हा कृषी अधीक्षक काशीनाथ तरकसे, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, रवींद्र पाटील, बाजीराव परदेशी, गटविकास अधिकारी सुनील प्रधान आदी मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, सर्व सत्कारमूर्ती शेतकरी उपस्थित होते. जिल्हा परिषद उपाध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील म्हणाले, जिल्ह्यात ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे. त्या ठिकाणी वृक्ष लागवड करून प्रत्येकाने झाडे वाढविण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची लागवड करून त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे आर्थिक विकास होण्यास मदत होईल. जिल्हा परिषदेमार्फत टूरिस्ट रिसॉर्ट करण्याचा प्रयत्न आहे. येणाऱ्या पर्यटकांना शेतीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.अलिबाग, पेण, पोलादपूर येथे कृषी उत्पादन विक्री केंद्र उभारण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून स्थानिक शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या मालाला चांगली बाजारपेठ देणे शक्य होऊ शकेल. कृषी विभागासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही, असे त्यांनी अखेरीस सांगितले.कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कारांचे वितरण या वेळी करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील जोमा दरवडा, पांडुरंग पारधी, प्रभाकर सखाराम पाटील, संतोष मांढरे, रामकृष्ण ठाकूर, सुनील ठाकूर, मोहन राणे, दत्तात्रेय पाटील, नामदेव बैलमारे, हरिश्चंद्र गरु डे, भगवान बेलोसे, नाथा हंबीर, जनार्दन वेटकोळी, बाळाराम निरगुडा, राधिका पाटील, विनोद दिवेकर, धर्माजी हिरवे, गोविंद वाघमारे, सुरेश वाघमारे, नथुराम भोईर, विजय वाघमारे, नारायण गोरेगावकर, मंगेश काप, नथुराम चोरगे, धनंजय सावंत, सहदेव खामकर, बबन खेडेकर, परेश पोलेकर, नारायण काते, किशोर फाळके, रामचंद्र कदम, सुधीर यादव, संदीप गोंधळी, गोविंद पाटील, कमळाकर कुऱ्हाडे, गणपत खारपाटील, लक्ष्मण पवार, जयपाल पाटील या प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. अलिबागमधील गटविकास अधिकारी तथा कृषी अधिकारी सुनील प्रधान, उरण येथील विस्तार अधिकारी प्रतिमा गोरे, माणगावमधील विस्तार अधिकारी रणजित लवटे, पोलादपूर येथील कृषी अधिकारी संभाजी भोइटे, पेणचे कृषी अधिकारी मच्छींद्रनाथ भालेराव चार गुणवंत कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती नरेश पाटील, कृषी सभापती दत्तात्रेय पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश गोटे यांच्या हस्ते सर्व गुणवंताचा सत्कार करण्यात आला.
प्रगतशील शेतकऱ्यांना संधी देणे आवश्यक
By admin | Published: July 02, 2017 6:15 AM