सीआरझेड क्षेत्रात बालाजी मंदिर बांधण्यास मनाई करा; नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींचे चंद्राबाबू नायडूंना पत्र

By नारायण जाधव | Published: June 13, 2024 05:59 PM2024-06-13T17:59:09+5:302024-06-13T17:59:33+5:30

सीआरझेड क्षेत्रात बांधण्यात येत असलेल्या या मंदिराबाबत चिंता व्यक्त करून पर्यावरणवाद्यांनी चंद्राबाबू नायडू यांना तातडीने ई-मेल पाठवले आहे.

Prohibit construction of Balaji temple in CRZ area; Letter from Navi Mumbai environmentalists to Chandrababu Naidu | सीआरझेड क्षेत्रात बालाजी मंदिर बांधण्यास मनाई करा; नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींचे चंद्राबाबू नायडूंना पत्र

सीआरझेड क्षेत्रात बालाजी मंदिर बांधण्यास मनाई करा; नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींचे चंद्राबाबू नायडूंना पत्र

नारायण जाधव, नवी मुंबई : आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी चंद्राबाबू नायडू यांनी पदभार स्वीकारताच, नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींनी त्यांना पत्र लिहून येथील उवले येथे पूरप्रवण व सीआरझेड क्षेत्रात तिरुपती बालाजी मंदिर बांधण्यास मनाई संबंधित देवस्थानला मनाई करावी, असे साकडे घातले आहे. सीआरझेड क्षेत्रात बांधण्यात येत असलेल्या या मंदिराबाबत चिंता व्यक्त करून पर्यावरणवाद्यांनी चंद्राबाबू नायडू यांना तातडीने ई-मेल पाठवले आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानमचे मंदिर प्रशासन आंध्र प्रदेश सरकारच्या अखत्यारीत येते. यामुळे नायडू या पत्रावर काय भूमिका घेतात, याकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे. सिडकोने अटल सेतूसाठीच्या कास्टिंग यार्डसाठी तात्पुरत्या दिलेल्या ४० हजार चौरस मीटरचा भूखंडाच्या काही क्षेत्रावर हे मंदिर बांधण्यात येत आहे, पूर्वी हा परिसर मासेमारी क्षेत्र होता.

नायडूंना पाठवलेल्या ई-मेलमध्ये, नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी सीआरझेड क्षेत्रात बांधण्यात येत असलेल्या तिरुपती बालाजी मंदिराच्या बांधकामाबाबत आश्चर्य व्यक्त करून एकीकडे जगभर समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे किनारी भागांना धोका निर्माण झाला आहे, अशा वेळी अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर एखादे मोठे मंदिर बांधणे शहाणपणाचे आहे का? असा प्रश्न केला आहे. मंदिराच्या जागेची उंची वाढवण्यासाठी भराव केला तरी आजूबाजूचा परिसर बुडून जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

मंदिराची जागा अत्यंत पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र आहे आणि पूररेषा त्या जागेतून कापली जाते. कुमार यांनी तेलगू देसम पक्षाचे प्रवक्ते नीलयपालम विजयकुमार यांच्या ऑगस्ट २०२१ मध्ये मंदिराच्या प्रकल्पात घाई केल्याबद्दल तत्कालीन राज्य सरकारची निंदा करणाऱ्या बातमीकडेही नायडू यांचे लक्ष वेधले आहे.

मंदिरासाठी इतरत्र भूखंड शोधा
मंदिराच्या बांधकामास विरोध नाही; परंतु नवी मुंबईतच जिथे जमिनीची कमतरता नाही, अशा पर्यावरणदृष्ट्या सुरक्षित भागात पूजास्थळ बांधावे, अशी सूचना केली आहे. कास्टिंग यार्डच्या बांधकामापूर्वी स्थानिक मासेमारी समुदाय येथे त्यांचे कार्य करत होते, असे सागरी शक्तीसह महाराष्ट्र लघु पारंपरिक मासे कामगार संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी सांगितले. दरम्यान, नॅटकनेक्टने मंदिराच्या भूखंड वाटपाला आव्हान देणारा अर्ज यापूर्वीच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (एनजीटी) दाखल केला आहे.

Web Title: Prohibit construction of Balaji temple in CRZ area; Letter from Navi Mumbai environmentalists to Chandrababu Naidu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.