बंदी झुगारून पांडवकडा धबधब्यावर धांगडधिंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 01:50 AM2018-08-06T01:50:45+5:302018-08-06T01:51:06+5:30
पांडवकडा या सुप्रसिद्ध धबधब्यावर पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणांवरून दरवर्षीप्रमाणे या वर्षीही बंदी घातली आहे.
- वैभव गायकर
पनवेल : पांडवकडा या सुप्रसिद्ध धबधब्यावर पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणांवरून दरवर्षीप्रमाणे या वर्षीही बंदी घातली आहे. येथील धोकादायक परिस्थितीमुळे आजवर शेकडो पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे. तरीदेखील बंदी झुगारून पर्यटक या ठिकाणी प्रवेश करीत आहेत. शनिवारी अशाच प्रकारे प्रवेश करून धिंगाणा घालणाऱ्या आठ पर्यटकांवर खारघर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यात दोन पर्यटक मुंबई येथील रहिवासी आहेत.
खारघर येथील पांडवकडा धबधब्यांचे पर्यटकांना आकर्षण आहे. नवी मुंबईसह मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील पर्यटक येथे येतात; परंतु सुरक्षिततेच्या ठोस उपाययोजनांअभावी या ठिकाणी दरवर्षी अपघात होतात. आतापर्यंत यात अनेक जणांचा बळी गेला आहे, त्यामुळे मागील काही वर्षांपासून पावसाळ्यात या धबधब्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांना अटकाव करण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, असे असले तरी उत्साही पर्यटक पर्यायी मार्गाचा अवलंब करीत धबधब्यावर प्रवेश करीत असल्याचे दिसून आले आहे. बंदी झुगारून पर्यायी मार्गाने धबधब्यावर जाणाºया पर्यटकांच्या विरोधात आता खारघर पोलिसांनी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी आठ पर्यटकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, अशाप्रकारे पर्यटकांवर गुन्हा दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुन्हे दाखल झालेल्यात पाच जण मुंबईचे, तर उर्वरित तीन जण नवी मुंबईतील रहिवासी आहेत.
खारघर पोलीस ठाण्यातील नोंदीनुसार मागील दहा वर्षांत १० ते १५ पर्यटकांचा धबधब्यात बुडून मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तविली जात आहे, त्यामुळेच पावसाळ्यात या धबधब्यावर मागील काही वर्षांपासून पर्यटकांना निर्बंध घालण्यात आले आहेत. पांडवकडा धबधब्यावर जाण्यासाठी मुख्य रस्त्यापासून या ठिकाणावर जाणारा रस्ता धोकादायक आहे. या मार्गातूनच पांडवकडा धबधब्याचे पाणी वाहते. या पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने यात वाहून अनेक पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
>पर्यटन क्षेत्र घोषित करण्याची मागणी
पांडवकडा धबधबा परिसर एक पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्याची मागणी स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. तशा प्रकारचे पत्रव्यवहारही ठाकूर यांनी संबंधित खात्याला केले आहेत. या परिसराचा विकास करून सुंदर पर्यटनस्थळ निर्माण केल्यास रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. असे पत्र त्यांनी दोन वर्षांपूर्वी लिहिले होते. नगरसेविका लीना गरड यांनीही बंदी उठविण्यासाठी वनाधिकाºयांची भेट घेतली होती.
>जीवितहानी
टाळण्यासाठीच कारवाई
या परिसरात पर्यटकांच्या जिवाचा धोका लक्षात घेऊनच वनविभागाने पर्यटकांना बंदी घातली आहे, तरीदेखील पर्यटक बंदी झुगारून या ठिकाणी धिंगाणा घालत असतात. या वर्षीही पाच जणांचा जीव धोक्यात आलेला होता. मात्र सुदैवाने ते बचावले. बंदी झुगारणाºया पर्यटकांना कायद्याचा धाक बसावा, या हेतूने शनिवारी आठ पर्यटकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
- प्रदीप तिदार,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक