स्मार्ट व्हिलेजसाठी प्रकल्पग्रस्तांची चळवळ

By admin | Published: November 26, 2015 01:33 AM2015-11-26T01:33:21+5:302015-11-26T01:33:21+5:30

सिडकोने नवी मुंबईची निर्मिती केली. शेतीच्या जमिनीवर सिमेंटची जंगले उभारली. अत्याधुनिक असे शहर निर्माण केले. शहर विकासाचा एक नवा मापदंड जगाला घालून दिला.

Project Affected Movement for Smart Village | स्मार्ट व्हिलेजसाठी प्रकल्पग्रस्तांची चळवळ

स्मार्ट व्हिलेजसाठी प्रकल्पग्रस्तांची चळवळ

Next

कमलाकर कांबळे, नवी मुंबई
सिडकोने नवी मुंबईची निर्मिती केली. शेतीच्या जमिनीवर सिमेंटची जंगले उभारली. अत्याधुनिक असे शहर निर्माण केले. शहर विकासाचा एक नवा मापदंड जगाला घालून दिला. परंतु ज्यांच्या त्यागामुळे सिडकोने हा डोलारा उभारला, ते प्रकल्पग्रस्तच दुर्लक्षित राहिले. शहराचा विकास करताना येथील गावांचा विकास खुंटला. असे असले तरी प्रकल्पग्रस्तांच्या युवा पिढीने विकासाचा हा बॅकलॉग भरून काढण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी स्मार्ट व्हिलेजची संकल्पना तयार करण्यात आली आहे.
आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असलेल्या नवी मुंबईची स्मार्ट सिटीसाठी निवड झाली आहे. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. स्मार्ट सिटी संकल्पनेच्या प्रसारासाठी केंद्र शासनाकडून महापालिकेला दोन कोटींचे अनुदान मिळाले आहे. त्याद्वारे महापालिकेने विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्मार्ट सिटीविषयी जनजागृती अभियान सुरू केले आहे. मात्र येथील मूळ गावांचा विकास झाल्याशिवाय स्मार्ट सिटीची संकल्पना अस्तित्वात येणार नाही, मात्र विकासाअभावी बकाल झालेल्या येथील मूळ गावांचा स्मार्ट सिटी अभियानाला अडथळा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांच्या युवापिढीने येथील गावेच स्मार्ट करण्याचा निर्धार केला आहे. आगरी-कोळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांची सुशिक्षित पिढी पुढे सरसावली आहे. सकारात्मक भूमिकेतून मागील सहा महिन्यांपासून हे प्रकल्पग्रस्त तरूण कामाला लागले आहेत.
महापालिका कार्यक्षेत्रातील २८ गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी या तरूणाईने कंबर कसली आहे. त्यासाठी गावपातळीवर ग्रामस्थांचे प्रबोधन केले जात आहे. स्मार्ट व्हिलेज म्हणजे काय याविषयी माहिती देण्यासाठी फेसबूक व व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला जात आहे. विशेष म्हणजे स्मार्ट व्हिलेजची संकल्पना विषद करण्यासाठी दीड तासाचे डॉक्युमेंटेशन तयार करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात विविध स्तरावर त्याचे सादरीकरण करण्यात येत आहे. त्याला ग्रामस्थांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने प्रकल्पग्रस्तांच्या या तरूण पिढीचा उत्साह दुणावला आहे.
शहरी भागात आलिशान इमारती, प्रशस्त रस्ते, उद्याने, क्रीडांगणे, शाळा, महाविद्यालये, वैद्यकीय सुविधा आदींची नियोजनबध्द पध्दतीने आखणी केली. परंतु उपनगराचा विकास करताना येथे असलेल्या मूळ गावांकडे मात्र सिडकोचे दुर्लक्ष झाले. सिडकोच्या नियोजनात राहून गेलेली समतोल विकासातील ही त्रुटी जागतिक स्तरावर नोंद झालेल्या या शहराच्या लौकिकास बाधा निर्माण करणारी ठरली आहे. शहराचा विकास करताना येथील मूळ गावेही विकासाच्या टप्प्यात येणे गरजेचे होते. मात्र सिडकोने त्याकडे दुर्लक्ष केल्याने या गावांची अवस्था झोपडपट्ट्यांपेक्षाही भयानक झाली आहे. गेल्या चाळीस वर्षांत प्रकल्पग्रस्तांची कुटुंबे वाढली. मुलांची, नातवंडांची लग्ने झाली. या विस्तारित कुटुंबांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधकामे उभारली. या अनियंत्रित बांधकामांमुळे गावे बकाल झाली आहेत. जुन्या कौलारू घरांची जागा ओबडधोबड इमारतींनी घेतली आहे. ग्रामस्थांना प्रलोभने दाखवून भूमाफियांनी गावातील मोकळ्या जागा बळकावल्या. त्यावर बेकायदा चाळी आणि टोलेजंग इमारती उभारल्या. त्यामुळे गावांतील प्रशस्त रस्त्यांचे पायवाटेत रूपांतर झाले आहे. वीस वर्षांपूर्वी ज्या घरांच्या दारापर्यंत चारचाकी वाहने जायची आता तेथपर्यंत रिक्षा नेणेही अवघड होवून बसले आहे.
नाले आणि गटारांचे अस्तित्व संपुष्टात आल्याने सांडपाणी वाहून नेण्याची जबाबदारी उरल्यासुरल्या रस्त्यांवर येवून ठेपली आहे. एकूणच या गावांतील प्राथमिक सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. आग किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मदतकार्य पोहचविताना कसरत करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांच्या युवा ब्रिगेडने उचललेले हे पाऊल
भावी पिढीसाठी आशादायक ठरणारे आहे.

Web Title: Project Affected Movement for Smart Village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.