प्रकल्पग्रस्त आज सिडकोवर धडकणार
By admin | Published: June 9, 2015 01:25 AM2015-06-09T01:25:00+5:302015-06-09T01:25:00+5:30
अस्तित्वाच्या लढाईसाठी नवी मुंबई, पनवेल व उरणमधील प्रकल्पग्रस्त मंगळवारी सिडकोवर धडक देणार आहेत.
नवी मुंबई : अस्तित्वाच्या लढाईसाठी नवी मुंबई, पनवेल व उरणमधील प्रकल्पग्रस्त मंगळवारी सिडकोवर धडक देणार आहेत. गरजेपोटी बांधलेल्या घरांवरील कारवाई तत्काळ थांबविण्यात यावी, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न तत्काळ सोडविण्याची मागणी केली जाणार आहे.
नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांमध्ये सिडको व शासनाविषयी असंतोष निर्माण झाला आहे. शासनाने २० हजार घरे नियमित करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु दुसरीकडे मागील काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. या कारवाईमुळे प्रचंड नाराजी पसरली आहे. प्रकल्पग्रस्त कृती समितीने सिडकोला जाब विचारण्यासाठी ९ जूनला धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चासाठी नवी मुंबईमधील २८ गावांमध्ये बैठका घेण्यात आल्या आहेत. पहिल्यांदाच सर्वपक्षीय राजकीय नेते प्रकल्पग्रस्तांच्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत. आतापर्यंत आंदोलनामध्ये तरुणांचा सहभाग कमी असायचा. परंतु यावेळी तरुणांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला आहे. प्रकल्पग्रस्त असलेले डॉक्टर, अभियंते, व्यावसायिक व उच्च पदावर असलेल्या सर्वांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळी ११ वाजता किल्ले गावठाणजवळील क्रोमा शोरूमपासून आंदोलनास सुरूवात होणार आहे. सिडकोभवनसमोर शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. या धडक मोर्चात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचा विश्वास प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील, कार्याध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)
पोलीस बंदोबस्त वाढवला
प्रकल्पग्रस्तांमध्ये प्रचंड असंतोष असल्यामुळे पोलीसही मोर्चासाठी कडक बंदोबस्त ठेवणार आहे. मोर्चाच्या मार्गावर व सिडको परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त होणार आहे.
आंदोलकांनीही मोर्चा पूर्णपणे शांततेमध्ये काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले असून सर्वांना शांततेत मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.