प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित केली जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 02:27 AM2018-05-22T02:27:35+5:302018-05-22T02:27:35+5:30
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : वाहतूककोंडी सोडविण्यासाठी रोरोचा पर्याय असल्याचे केले स्पष्ट
नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. गरजेपोटी घरांच्या बाबतीत शासनाने निर्णय घेतलेला आहे. यामध्ये काही तांत्रिक अडचणी असून लवकरच शहरातील प्रकल्पग्रस्तांच्या घरासंदर्भात योग्य निर्णय घेवू, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस दिले आहे.
तळवली नाका व तुर्भेतील सविता केमिकल्स कंपनीसमोर उड्डाणपूल तर महापे येथे लोकमत प्रेससमोर भुयारी मार्गाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी त्यांनी एमएमआर क्षेत्रातली वाहतूककोंडी सोडवण्यासाठी रोरो सर्व्हिस महत्त्वाची ठरणार असून लवकरच त्याची सुरवात होणार असल्याचे सांगितले. सद्यस्थितीला मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई या शहरांमध्ये वाहतूककोंडीची समस्या गंभीर असून, ट्रक व कंटेनरमुळे ती भेडसावत असल्याचे दिसून येत आहे. यावर जलवाहतुकीला प्राधान्य देत रोरो (रोल आॅन, रोल आॅफ) सर्व्हिसच्या मदतीने हे कंटेनर बोटीतून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोचवले जातील, असेही ते म्हणाले. विदेशातून या रोरो बोटी मागवल्या असून काही दिवसातच त्या पोचतील, असेही ते म्हणाले. तर एमएमआर क्षेत्रात एकूण २५८ कि.मी. अंतराचे मेट्रोचे जाळे पसरवले जाणार आहे. त्याचे संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर देशातील सर्वात मोठे मेट्रोचे जाळे एमएमआर क्षेत्रात असेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
ठाणे-बेलापूर मार्गावर बांधून तयार असलेले पूल व भुयारी मार्ग लवकर वापरासाठी खुले करावेत, अशी मागणी स्थानिक आमदार संदीप नाईक यांच्यासह खासदार राजन विचारे यांनी केली होती. याची दखल घेत एमएमआरडीएने दोन पूल व एका भुयारी मार्गाच्या उद्घाटनाचा हा सोहळा उरकला. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापौर जयवंत सुतार, खासदार राजन विचारे, आमदार सुभाष भोईर, संदीप नाईक, मंदा म्हात्रे आदी उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्तांना दिलासा
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये एमएमआरडीए क्षेत्रातील कामांविषयी माहिती दिली. अनेक दिवसांपासून सिडकोने घेतलेल्या भूमिकेमुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये संभ्रमावस्था आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये आमदार मंदा म्हात्रे यांच्या पाठपुराव्याचा संदर्भ देवून सांगितले की, मंदाताई तुम्ही काळजी करू नका, भूमिपुत्रांचे प्रश्न आम्ही सोडविल्याशिवाय राहणार नाही. प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न सोडविले जातील असे स्पष्ट केले असल्यामुळे प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला.
ऐरोली कटाई नाका रोडचे काम
ऐरोली कटाई नाका प्रकल्पामध्ये ठाणे-बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग ४ यांना जोडणारा रस्ता तयार केला जाणार आहे. ३.५७ किलोमीटर लांबीचा हा रोड असणार आहे. त्याची १.७० किलोमीटर लांबीचा बोगदा व १.८७ किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गाचाही समावेश असणार आहे. यासाठी तब्बल ३८२ कोटी रूपये खर्च होणार आहेत.