पनवेल : नावडे प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या पथकाला प्रकल्पग्रस्तांच्या विरोधाला सामोरे जावे लागत कारवाई स्थगित करावी लागली. प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी सिडकोने बांधकामावर कारवाईच्या तारखा विविध नोडनुसार जाहीर केल्यानंतर नवी मुंबई प्रकल्पबाधित ९५ गाव संघर्ष समितीने यासंदर्भात रविवारी कोपरा गावातील समाजमंदिरात बैठकीचे आयोजन करीत सिडकोच्या कारवाईचा विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.सिडकोने ९५ गावांतील अनेक प्रश्न अधांतरी ठेवले असताना प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांवर कारवाई करण्यासाठी सिडको वारंवार पुढाकार घेत आहे. अनेक वेळा आश्वासने देऊन सिडको प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवित नाही. नवी मुंबई विमानतळग्रस्त, जेएनपीटी, सिडको प्रकल्पग्रस्त आदी सर्वांचे प्रश्न एक असून, सिडकोविरोधात पुन्हा एकत्र लढा देण्याची गरज असल्याचे या वेळी आमदार बाळाराम पाटील यांनी स्पष्ट केले. आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याची गरज असून लवकरच या संदर्भात नियोजन करून सिडको विरोधात प्रकल्पग्रस्तांच्या सर्व संघटनांशी चर्चा करून सिडको विरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांनीदेखील सिडकोच्या आडमुठे धोरणाचा समाचार घेतला. एकीकडे ९५ गावांतील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित असताना सिडकोने ‘नैना’च्या नियोजनाला सुरुवात केली आहे. सर्वप्रथम ९५ गावांतील प्रश्न सोडवा, त्यानंतरच ‘नैना’ क्षेत्रातील नियोजन करा, असे या वेळी म्हात्रे यांनी सांगितले.
सिडकोच्या विरोधात तीव्र लढा उभारणार, प्रकल्पग्रस्त नेते एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 12:40 AM