एमआयडीसीलगत १४८७ कोटींचे प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 01:45 AM2018-05-30T01:45:54+5:302018-05-30T01:45:54+5:30
राज्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या ठाणे-बेलापूर एमआयडीसीची समस्यांच्या विळख्यातून मुक्तता होवू लागली आहे.
नामदेव मोरे
नवी मुंबई : राज्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या ठाणे-बेलापूर एमआयडीसीची समस्यांच्या विळख्यातून मुक्तता होवू लागली आहे. या परिसरामधील रस्ते विकासावर तब्बल १४८७ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. यामध्ये पालिकेने ७५० कोटी रुपये खर्च करून रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले आहे. एमआयडीसी स्वत: २०० कोटी रुपये खर्च करून २१ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करत असून एमएमआरडीएने ५५० कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करून उड्डाणपुलासह इतर महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे काम करण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रातील पहिल्या औद्योगिक वसाहतीची सुरवात ठाणे जिल्ह्यापासून झाली आहे. याच जिल्ह्याचा भाग असलेल्या नवी मुंबईमधील दिघा ते नेरूळपर्यंत राज्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जात आहे. रिलायन्ससारख्या महत्त्वाच्या उद्योगसमूहाचे मुख्यालय या परिसरामध्ये आहे. परंतु २००८ पर्यंत औद्योगिक वसाहतीची स्थिती अत्यंत बिकट झाली होती.
एमआयडीसीच्या हद्दीला लागून असलेला ठाणे- बेलापूर रोड खड्डेमय झाला होता. तुर्भे ते ठाणे अंतर पूर्ण करण्यास दोन ते तीन तास वेळ लागत होता. येथील औद्योगिक संघटनांनी राज्य शासनाकडे वारंवार समस्यांचे गाºहाणे ऐकवले होते. एमआयडीसीमधील रोडवरून वाहतूक करणे अशक्य झाले आहे. छोटी वाहने जावूच शकत नाहीत. याचा परिणाम उद्योगावर होत असून अनेकांनी उद्योगांचे स्थलांतर करण्यास सुरवात केली होती. अखेर महापालिकेने या रोडचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला. २००८ पासून या रोडवरील वाहतूककोंडी जवळपास संपली. पण अंतर्गत रोडची स्थिती अत्यंत बिकट झाली होती. अखेर महापालिकेने मुकुंद ते महापे, महापे ते फायझर रोड, तुर्भेवरून फायझर ते एलपी जंक्शन असे सर्व मुख्य रोड व त्याला जोडणारे सात रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे काम केले. सद्यस्थितीमध्ये एमआयडीसीचे सर्व प्रमुख रोड खड्डेविरहित झाले आहेत.
महापालिकेबरोबर एमएमआरडीएने मोठा निधी या परिसरामधील प्रकल्पांवर खर्च केला आहे. ठाणे- बेलापूर रोडवरील दोन उड्डाणपूल व एक भुयारी मार्गासाठी १५५ कोटी रुपये खर्च केले आहेत. याशिवाय महापे ते शिळफाटा परिसरामध्ये एका उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण केले असून दुसऱ्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. अडवली भुतावली गावाजवळ होणाºया या पुलामुळे शिळफाटा परिसराकडे जाणाºया रोडवरील वाहतूक समस्या पूर्णपणे सुटणार आहे. याशिवाय ऐरोली कटई नाका प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. ठाणे-बेलापूर रोड ते राष्ट्रीय महामार्ग ४ यांना जोडणाºया या रोडसाठी ३८२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
एमआयडीसीनेही या परिसरातील २१ किलोमीटर लांबीचे रस्ते बनविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी २०० कोटी रुपये खर्च होणार असून पुढील तीन ते चार वर्षांमध्ये पूर्ण एमआयडीसीचा मेकओव्हर होणार आहे.
अडवली भुतावली गावाजवळील उड्डाणपुलाचे काम सुरू
ऐरोली कटई रोडचा ३८२ कोटी रूपयांचा प्रकल्प महापेसमोर ४८५ मीटर लांबीचा भुयारी मार्ग
एमआयडीसी मुख्यालयासमोरील उड्डाणपूल
घणसोली ते तळवली
१४५१ मीटर लांबीचा उड्डाणपूल
सविता केमिकलसमोर
५७६ मीटर लांबीचा उड्डाणपूल
नवी मुंबई महानगरपालिकेने प्लास्टिकचा पुनर्वापर रोड बनविण्यासाठी करण्यास सुरवात केली आहे. सद्यस्थितीमध्ये दहा ठिकाणी रोड बनविण्यासाठी प्लास्टिक लगद्याचा वापर करण्यात आला आहे. महापे येथील एनएमएमटी डेपोपासून आतील बाजूला असलेल्या रोड या तंत्राचा वापर करून तयार केला आहे. हा नवीन प्रयोगही यशस्वी झाला आहे. याशिवाय संपूर्ण एमआयडीसी खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. वितळविलेल्या प्लास्टिक लगद्याचा वापर केल्याने रस्त्याचा दर्जा चांगला होत असून हा प्रयोग यशस्वी ठरल्यास शहरात इतर ठिकाणीही राबविण्यात येणार आहे.
तुर्भे स्टेशनसमोर उड्डाणपूल
ठाणे-बेलापूर रोडवर तुर्भे रेल्वे स्टेशनसमोर वाहतूककोंडीचा प्रश्न कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दोन उड्डाणपूल व एक भुयारी मार्गाचे २१ मे रोजी लोकार्पण केले तेव्हा ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी तुर्भे रेल्वे स्टेशनसमोर नवीन उड्डाणपुलाची मागणी केली होती. याशिवाय स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांनीही या विषयाचा वारंवार पाठपुरावा केला आहे. मुख्यमंत्र्यांनीही याविषयी पाहणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असून एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी नुकतीच या परिसराची पाहणी केली आहे.