कर्जत : तालुक्यातील अरवंद येथील रुक्मिणी शिवराम पवार या अतितीव्र कुपोषित श्रेणीतील एका ४ वर्षीय आदिवासी मुलीच्या मदतीला एकात्मिक बालविकासचे प्रकल्प अधिकारी सरसावले आहेत. राष्ट्रीय पोषण माह अभियानाचे औचित्य साधत, रुक्मिणीच्या आईला व इतर भावंडांना नवीन कपडे व महिनाभर पुरेल एवढे धान्य प्रत्यक्ष घरी जाऊन वाटप करण्यात आले.
कर्जत हा कुपोषण संख्या जास्त असलेला तालुका असून, शासनाच्या विविध योजना आणि विविध शासकीय विभागात समन्वय करत, कुपोषण कमी करण्याचे सातत्याने प्रयत्न केले जात आहे. सप्टेंबर महिना हा देशभर राष्ट्रीय पोषण माह म्हणून शासन स्तरावर साजरा केला आहे. या पोषण माहचे औचित्य साधून, कर्जत येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प एकचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यांनी अरवंद येथील अंगणवाडीमधील रुक्मिणी शिवराम पवार या अतितीव्र श्रेणीतील कुपोषित मुलीला दत्तक घेतले असून, या मुलीला साधारण श्रेणीत आणेपर्यंत तिला शक्य तेवढी वैयक्तिक स्वरूपात मदत करण्याची तयारी दर्शविली आहे.
विधवा आणि अपंग आई, विधवा आजी व तीन भावंडे, स्वत:चे पक्के घर नाही, आधार कार्ड व जातीचा दाखला नसल्यामुळे इतर शासकीय योजनाचा लाभ नाही. अशातच कोरोना महामारीत रोजगार नसल्यामुळे उपासमारीची वेळ आलेल्या रुक्मिणी व तिच्या कुटुंबीयांना अनिकेत पालकर यांनी एक महिनाभर पुरेल एवढे धान्य व नवीन कपड्यांची मदत प्रत्यक्ष वाडीवर जाऊन केली आहे.राष्ट्रीय पोषण माहचे औचित्य साधून रुक्मिणी या कुपोषित मुलीला दत्तक घेतले असून, याही पुढे तिला नियमितपणे वैयक्तिक स्वरूपात मदत देणार आहे, तसेच शासनाच्या इतर योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.-अनिकेत पालकर, एकात्मिक बालविकासचे प्रकल्परक्मिणीही मागच्या वर्षी आपण चालू केलेल्या बाल उपचार केंद्रात दाखल होती, त्यावेळी तिच्या आईला अंत्योदय योजनेचे रेशन कार्ड तातडीने बनवून दिले आहे, तसेच संजय गाधी निराधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव तहसील कार्यालयात सादर केला आहे. तिचे आधार कार्ड बनविणे, घराखालील जागा मिळवून घरकूल लाभ देणे, यासाठी आमच्या संस्थेकडून प्रयत्न करत आहोत. पालकर यांच्याप्रमाणेच जर तालुक्यातील प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याने एक-एक मूल दत्तक घेतले, तर निश्चितच तालुक्यातील कुपोषण कमी होऊ शकेल .अशोक जंगले, कॅन प्रकल्प समन्वयक