नवी मुंबई : विमानतळ परिसरामधील कोल्ही व पारगाव येथील शेतकऱ्यांनी विमानतळासाठीच्या भरावाचे काम बुधवारी थांबविले. टाटा पॉवरलाइनखालील जमिनीचा मोबदला मिळावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरामधील कोल्ही व पारगावमधील ५० पेक्षा जास्त शेतकºयांची १७ हेक्टर जमीन टाटा पॉवरलाइन खाली आहे. या जमिनीचा मोबदला मिळावा व त्या जमिनीच्या मोबदल्यात साडेबावीस टक्के मोबदला मिळावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. पुनर्वसन विकास समितीच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून यासाठी सिडकोकडे पाठपुरावा सुरू आहे; परंतु अद्याप काहीही निर्णय घेण्यात आलेला नसल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी टाटा पॉवरलाइनखाली सुरू असलेल्या भरावाचे काम थांबविले. या आंदोलनामुळे दिवसभर काम बंद पडले आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन आंदोलकांशी चर्चा केली. स्थानिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे पुढील दोन दिवस काम बंद ठेवण्याचे व या दरम्यान सिडकोबरोबर चर्चा करण्याची सूचना पोलिसांनीही केली आहे. सिडको पुनर्वसन विकास समितीचे अध्यक्ष अविनाश नाईक, नंदकुमार भोईर यांच्यासह अनेकांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता.विमानतळाच्या कामाला विरोध नाही; परंतु टाटा पॉवरलाइनखालील जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. ही मागणी मान्य होईपर्यंत लढा सुरूच ठेवला जाणार असल्याची माहिती अविनाश नाईक यांनी दिली.
विमानतळाच्या भरावाचे काम प्रकल्पग्रस्तांनी थांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 3:27 AM