लांबलेल्या निवडणुकीने उमेदवारांची वाढली चलबिचल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 01:28 AM2021-04-05T01:28:20+5:302021-04-05T01:28:36+5:30
भाड्याने घेतलेली कार्यालये बंद करण्याची वेळ
नवी मुंबई : महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक मागील एक वर्षापासून लांबणीवर गेली आहे. तीन महिन्यांपूर्वी शहरातील कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाल्याने पुन्हा निवडणुकीच्या हालचालींना गती मिळाली होती. मात्र अशातच कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने निवडणुकीचे बिगुल वाजता वाजता थांबल्याने प्रत्येक निवडणुकीला रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांवर भाड्याने घेतलेली कार्यालये बंद करण्याची वेळ आली आहे.
गतवर्षी नवी मुंबई महापालिका निवडणुकीची हालचाल सुरू असतानाच कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे ही निवडणूक लांबणीवर गेली. त्यानंतर दिवाळीदरम्यान निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात होती. अशातच कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागल्याने इच्छुक उमेदवारांच्या पदरी पुन्हा निराशा आली. त्यानंतर चालू वर्षाच्या सुरुवातीला शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा बऱ्यापैकी नियंत्रणात आला होता. प्रतिदिन केवळ २० ते ३० रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे मार्चमध्ये निवडणुकीची घोषणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. नेमके त्याच दरम्यान शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सध्या प्रतिदिन ९०० ते १००० कोरोनाबाधित आढळू लागले आहेत. यामुळे पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी लांबणीवर गेली आहे. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या पूर्णपणे नियंत्रणात आल्यावरच ही निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी अद्याप काही महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. परंतु मागील एक वर्षापासून अनेक इच्छुक उमेदवारांनी तयार केलेल्या प्रभागात प्रचार कार्यालये भाड्याने घेतली आहेत. त्यात प्रत्येक निवडणुकीत नशीब आजमावायच्या उद्देशाने रिंगणात उतरणाऱ्या सर्वपक्षीय व अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
सोयीनुसार अनेकांनी प्रभागात एकापेक्षा अनेक कार्यालये सुरू करून जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न चालवला होता. त्यात पहिल्यांदाच निवडणुकीत उतरणाऱ्या अनेकांनी कोरोनाकाळात घरोघरी मदतीचा हात देऊन आपली ओळख वाढवली होती. मात्र कोरोनामुळे लांबणीवर जाणाऱ्या निवडणुकीमुळे त्यांच्यापैकीही अनेकांनी पुन्हा एकदा प्रभागाकडे पाठ फिरवून निवडणुकीच्या घोषणेकडे डोळा लावला आहे.