पनवेल : पनवेल तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार थंडावला असून प्रचार सभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. तालुक्यात आठ जिल्हा परिषद गट आणि सोळा पंचायत समिती गण येत असून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, भारतीय जनता पार्टी, अपक्ष आदी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची प्रचारात आघाडी दिसून आली. त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावांमधे प्रचारसभांवर जोर होता. प्रचारासाठी उमेदवारांकडून वेगवेगळे फंडे वापरण्यात येत असून त्यामध्ये प्राधान्याने विविध गावांतील सभा, मतदारांसाठी जेवणावळी, महिला मतदारांसाठी हळदी-कुंकू, घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी अशा विविध क्लृत्या उमेदवारांकडून लढविण्यात आल्या. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तोफा रविवारी रात्री थंडावल्या.गेल्या दहा ते पंधरा दिवसांत शेकाप भाजपाने एकमेकांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजकीय सभा ठेवण्यात आल्या होत्या. मतदान दिवसापूर्वी ४८ तास आधीच प्रचारसभांना आवर घालावा लागल्याने छुप्या प्रचाराला वेग येणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर पनवेलमधील ग्रामीण भागामध्ये प्रचाराला सुरु वात झाली होती. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील बहुरंगी लढतींमुळे निवडणुका चुरशीने होणार आहेत. काही ठिकाणी निवडणुकीची काहीच तयारी नसताना उमेदवारांना अचानकपणे निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागले. (वार्ताहर)
पनवेलमध्ये प्रचाराचे फं डे
By admin | Published: February 20, 2017 6:16 AM