मयूर तांबडे/ पनवेलपनवेल महापालिकेच्या निवडणुकीला अवघे ३० दिवस उरले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. आपली उमेदवारी निश्चित झाली नसली तरी देखील स्वयंघोषित उमेदवारांनी आपापल्या परीने प्रचाराला व वैयक्तिक गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. स्वयंघोषित उमेदवारांमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनाही अच्छे दिन आले आहेत. दिवसाला ५०० ते ७०० रु पये मिळणार असल्याने त्यांचा भाव काही दिवसात आणखी वधारण्याची शक्यता आहे. मात्र तापमानाचा पारा वाढल्याने प्रचारात अडचणी येत आहेत. ऐन उन्हाळ्यात होऊ घातलेली पनवेल महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वच पक्षांनी ती प्रतिष्ठेची केली आहे. मात्र वाढत्या उकाड्यामुळे उमेदवार व कार्यकर्ते हैराण झाले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापासून तर निकाल हाती येईपर्यंतची सर्व प्रक्रि या उन्हाळ्यातच पार पडणार असून त्याचा मतदानावर व पर्यायाने निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.यंदा मार्च महिन्यापासूनच उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यात रस्त्यावरील वर्दळ दुपारी १२नंतर तुरळक झालेली दिसते. शहरी भागापेक्षा महापालिका क्षेत्रातील ग्रामीण भागात उन्हाचा परिणाम निश्चितच जाणवणार आहे.पनवेल महापालिकेचा बिगुल वाजल्याने निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. ऐन उन्हाळ्यात निवडणूक लागल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत. उन्हाच्या झळा सोसत उमेदवारांना प्रचार करावा लागणार आहे. स्वयंघोषित उमेदवार प्रचाराला लागले असून त्यांनी बैठकीवर जोर दिला आहे, तर इच्छुक उमेदवार आपल्या हातून उमेदवारी निसटू नये यासाठी प्रयत्न करत आहेत. येत्या काही दिवसांत पनवेल परिसरात प्रचाराचा धुरळा उडणार आहे. मात्र ४0 डिग्री सेल्सियस तापमानात घामाघूम होत उमेदवारांना मतांसाठी मतदारांना साद घालावी लागणार आहे.
स्वयंघोषित उमेदवारांचाही प्रचाराचा धडाका
By admin | Published: April 24, 2017 2:38 AM