ठाणे : सर्जिकल स्ट्राईकनंतरही आपल्या देशात काही लोक पुरावे कसे मागतात, असा प्रश्न कारगिल युद्धातील महावीरचक्र विजेते दिगेंद्रकुमार यांनी विचारला. आपल्या देशात काही लोकांना ‘भारतमाता की जय’ म्हणायची लाज वाटते, अशी नाराजी व्यक्त करत यापुढे ‘जय हिंद’ म्हणा आणि इतरांनाही म्हणायला भाग पाडा, असे आवाहन त्यांनी केले. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेतील पहिल्या व़्याख्यानात ते बोलत होते. १७ वर्षांपर्वी झालेल्या कारगील लढाईची शौर्यगाथा त्यांनी उलगडली. क्रिकेटरने चांगली कामगिरी केली, तर त्यांच्यावर कोट्यवधींची उधळण होते. मात्र, सैनिकांनी कितीही चांगली कामगिरी केली, दहशतवाद्यांचा खातमा केला, तरी त्यांचे कौतुकही होत नाही आणि आर्थिक मोबदलाही पुरेसा मिळत नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. क्रिकेटरने सहा सिक्सर मारले की त्याला सहा कोटी रूपये दिले जातात. परंतु सैनिकाने सहा दहशतवादी मारल्यावर त्याला सहा हजार रुपयेदेखील मिळत नाहीत, ही नाराजी त्यांनी उदाहरणासह पटवून दिली. कारगील युद्धात जखमी झाल्यावर श्रीनगरच्या रुग्णालयात मला दाखल करण्यात आले. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी मला भेटायला आले होते. तेव्हा त्यांनी ‘तू वीरपूत्र आहेस, कलियुगातला भीम आहेस,’ अशा शब्दांत कौतुक केले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी मला पुण्यातील रुग्णालयात दाखल केले आणि या महाराष्ट्राच्या धरतीने मला पुनर्जन्म दिला. मी तिचा कायमच ऋणी आहे. तेथील रुग्णालयात माझ्यावर सहा महिने उपचार सुरू होते. १४ आॅगस्टला जनरल मलिक मिठाई घेऊन मला भेटायला आले, तेव्हा त्यांनी मला महावीरचक्र जाहीर झाल्याचे सांगितले. २६ जानेवारीला राष्ट्रपती भवनात ते प्रदान करण्यात आले. तेव्हापासून देश माझ्या पराक्रमाचे कौतुक करीत आहे. जिवंतपणी महावीरचक्र मिळालेला मी पहिला सैनिक आहे, हे सांगत त्यांनी आयुष्य आनंदाने जगण्याचा सल्ला दिला. ‘दंगल’ चित्रपटात दाखविण्यात आलेली घटना सत्य आहे. हरियाना, राजस्थानमध्ये मुलींना दुय्यम वागणूक दिली जाते. त्यांना कुस्तीच्या ‘दंगली’त पाठविले जात नाही. परंतु महावीर फोगाट यांनी आपल्या मुलींना आॅलिम्पिकपर्यंत पोचविले. नोटाबंदीच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. १९९३ साली ज्यावेळी आम्ही दहशतवादी मारले, तेव्हा त्यांच्याकडे सहा लाख रुपये मिळाले आणि त्या भारतीय चलनातल्या नोटा होत्या. त्यावेळी मी पंतप्रधानांना पत्र लिहून याकडे लक्ष वेधले. त्यामुळे देशात नोटबंदीचा घेण्यात आलेला निर्णय स्वागतार्ह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाही, तर त्यांच्या कामाचे मी कौतुक करीत आहे, असे सांगताना त्यांनी मी कोणत्याही पक्षाचा नाही; तर या भारतमातेचा पुत्र आहे. अन्य देशात सैनिक दिसला, की त्याला उभे राहून सलाम करतात. परंतु सैनिकाला ‘जय हिंद’सुद्धा म्हणत नाहीत. आपल्या देशात वीरांची कमतरता नाही. देशाभिमान जागविण्याची गरज आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
सर्जिकल स्ट्राइकचे कसले पुरावे मागता?
By admin | Published: January 10, 2017 6:17 AM