लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मागील १५ दिवसांपासून पनवेल महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असून, सायंकाळी ५ वाजल्यानंतर या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. मतदान २४ मे रोजी होणार आहे. त्यामुळे सोमवारी संध्याकाळी ५ नंतर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसापर्यंतचे ३६ तास उमेदवारांसाठी खऱ्या अर्थाने कसोटीचे ठरणार आहेत. पनवेल ही रायगड जिल्ह्यातील पहिलीच महापालिका असल्याने होणाऱ्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या महापालिकेवर सत्ता स्थापण्यासाठी भाजपासह शेकाप व शिवसेनेने जोरदार तयारी केली आहे. शेकापने काँग्रेस, राष्ट्रवादीची महाआघाडी स्थापन करून, भाजपासमोर आव्हान निर्माण केले आहे. भाजपा आणि महाआघाडी यांच्यातच खरी चुरस असणार आहे. तर शिवसेना आणि मनसेसाठी ही निवडणूक अस्तित्वाची ठरली आहे. याचा परिणाम म्हणून, प्रचाराच्या मागील १५ दिवसांत सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला. सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वत:ची प्रतिमा तयार करतानाच प्रतिस्पर्धी उमेदवारांचे वाभाडे काढण्यात आले.प्रचार संपण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आदींच्या जाहीर सभा झाल्या. या सभांतून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार!
By admin | Published: May 22, 2017 2:14 AM