प्रॉपर्टी कार्डचे काम प्रगतिपथावर, सद्यस्थितीत नवी मुंबई महापालिकेकडे सुमारे १७०० मालमत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 02:48 AM2019-05-08T02:48:38+5:302019-05-08T02:48:57+5:30
नवी मुंबई महापालिकेच्यामालमत्ता विभागाच्या स्थावर आणि जंगम मालमत्तांची नोंदणी व माहिती संकलन करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
- योगेश पिंगळे
नवी मुंबई - नवी मुंबई महापालिकेच्यामालमत्ता विभागाच्या स्थावर आणि जंगम मालमत्तांची नोंदणी व माहिती संकलन करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. या मालमत्तांचे प्रॉपर्टी कार्ड बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सर्वच मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, महापालिकेकडे सद्यस्थितीत सुमारे १७०० मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले आहे. या मालमत्तांचे मूल्यांकनही करण्यात येणार असून, प्रॉपर्टी कार्डमुळे महापालिकेच्या मालमत्तेचा कायदेशीर अभिलेख तयार होणार आहे.
नवी मुंबई महापलिकेकडून शहरातील सिडको, एमआयडीसी, शासन हस्तांतरित आणि भूतपूर्व ग्रामपंचायतीकडून महापालिकेकडे वर्ग झालेल्या मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. महापालिका लेखा संहिता लेखा ३० व ३२ नुसार मालमत्तांची नोंदणी व माहिती संकलनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच सर्वेक्षण झालेल्या मालमत्तांचे प्रॉपर्टी कार्डदेखील बनविण्याचे कामही सुरू आहे. यामध्ये उद्याने, ट्रिबेल्ट, मोकळे भूखंड, खेळाची मैदाने, स्मशानभूमी, दफनभूमी, शौचालय, फेरीवाला भूखंड, मार्केट, बहु-उद्देशीय इमारत, सांस्कृतिक भवन, नागरी आरोग्य केंद्र, बाल-माता रु ग्णालय, अग्निशमन, समाज मंदिर, मलनि:सारण आणि मलउदंचन केंद्र, बोअरवेल, तलाव, धारणतलाव, विहिरी, जलकुंभ, स्टेज, शाळा, निवासस्थान, अंगणवाडी, व्यायामशाळा, वाचनालय, कार्यालय, विरंगुळा केंद्र, डम्पिंग ग्राउंड, होल्डिंग पॉण्ड, कुकशेत पुनर्वसित गावठाणासाठी हस्तांतरित भूखंड, पार्किंग, वाहनतळ, सार्वजनिक चावडी, महिला सक्षमीकरण केंद्र, नाट्यगृह, मलप्रक्रिया केंद्र, मोरबे धरण, जलशुद्धीकरण केंद्र, एसटीडी, पीसीओ, मिल्क बूथ आदी मालमत्तांचा समावेश असून, या सर्वच मालमत्तांची नोंदणी करण्यात येत आहे.
सिडको आणि एमआयडीसीकडून महापालिकेकडे सुमारे ६१० मालमत्ता हस्तांतरित झाल्या आहेत. तसेच ग्रामपंचायती, शासन व इतर माध्यमाने तसेच महापालिकेने विकसित केलेल्या सुमारे ११५० ते ११९० मालमत्तांची नोंदणी करण्यात आली आहे. नोंदणी झालेल्या मालमत्तांनुसार महापालिकेकडे सद्यस्थितीमध्ये सुमारे १७५० ते १८०० मालमत्तांचा समावेश आहे. महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या नोंदणी प्रक्रियेमध्ये मालमत्तेचा पत्ता, भूखंडाचे, वास्तूचे क्षेत्रफळ, बाजार मूल्य आदी सर्वच माहितीची नोंद होत आहे.
मूल्यांकन ठरणार अर्थसाहाय्यासाठी उपयुक्त
महापालिकेच्या सर्वच मालमत्तांचे सर्वेक्षण होऊन खासगी संस्थेच्या माध्यमातून मालमत्तेचे मूल्यांकनही करण्यात येणार आहे. मूल्यांकन करण्याच्या प्रस्तावाला मान्यताही मिळाली असून, मूल्यांकनामुळे केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणाºया योजनांसाठी अर्थसाहाय्य मिळविण्यास उपयुक्त ठरणार आहे.
महापालिकेच्या सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण झाले आहे. प्रॉपर्टी कार्ड बनविण्याचे काम सुरू आहे. खासगी संस्थेच्या माध्यमातून मालमत्तांचे मूल्यांकन काढण्यात येणार आहे, या प्रस्तावाला मान्यता मिळालेली आहे. प्रॉपर्टी कार्डच्या माध्यमातून महापालिकेच्या मालमत्तेचा कायदेशीर अभिलेख तयार होईल. महापालिकेची आर्थिक कुवतदेखील यावरच अवलंबून असल्याने हे अतिशय महत्त्वाचे आहे.
- दादासाहेब चाबुकस्वार, उपआयुक्त, मालमत्ता विभाग