मालमत्ताकर थकबाकीप्रकरण; लघू उद्योजकांच्या १५८ मालमत्ता सील, आणखी १४४ थकबाकीदारांवरही कारवाई करणार
By नामदेव मोरे | Published: July 27, 2023 08:02 PM2023-07-27T20:02:15+5:302023-07-27T20:03:30+5:30
उर्वरीत १४४ जणांवरही लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.
नवी मुंबई : ठाणे बेलापूर औद्योगीक वसाहतीमधील मालमत्ताकर थकबाकीदारांविरोधात महानगरपालिकेने मोहीम सुरू केली आहे. ३०२ थकबाकीदारांपैकी १५८ जणांची मालीमत्ता सील केली आहे. उर्वरीत १४४ जणांवरही लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील लघुउद्योजकांनी अनेक वर्षांपासून मालमत्ताकर भरलेला नाही. सर्वोच्च न्यायालयानेही उद्याेजकांना कर भरण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत ४२४ जणांनी १४८ कोटी रूपये कर थकविला होता. त्यांना नोटीस दिल्यानंतर १२२ जणांनी एकूण थकबाकीपैकी मुळ मालमत्ता कराची ३६ कोटी रूपये जमा केली होती. उर्वरीत ३०२ जणांनी नोटीस देऊनही कर भरलेला नाही. महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी संबंधीतांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मालमत्ताकर विभागाने १५८ उद्योजकांच्या मालमत्ता सील केल्या आहेत. कारवाईनंतर ८७ जणांनी दिड कोटीची थकबाकी भरली आहे. अजून १४४ जणांवरही लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.
लघु उद्योजकांना कर भरण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानेही दिले आहेत. या आदेशाप्रमाणे सर्वांना नोटीस देण्यात आली आहे. सर्व उद्योजकांनी थकबाकी वेळेत भरावी . अन्यथा नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल असा इशाराही मालमत्ताकर विभागाच्या प्रमुख अतीरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी दिला आहे. मालमत्ता कर हा मनपाच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. या उत्पन्नामधूनच शहर विकासाची कामे करण्यात येत आहेत. एमआयडीसीमध्येही रस्ता, गटारे व इतर कामे केली जात असून उद्याेजकांनी वेळेत कर भरावा असे आवाहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनीही केले आहे.