निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता कर माफ करण्याचे गाजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 04:21 AM2019-07-04T04:21:32+5:302019-07-04T04:21:43+5:30
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.
नवी मुंबई : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ५०० चौरस फुटापर्यंतच्या निवासी मालमत्तांना करमाफीचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. माजी मंत्री गणेश नाईक यांनी याविषयी महापौरांना निर्देश दिले असून येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये याविषयी अशासकीय ठराव मांडला जाण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. कार्यक्रमांची संख्याही वाढली असून जनसंपर्काचा धडाका सुरू आहे. केलेल्या कामांची व भविष्यातील कामांची आश्वासनेही देण्यास सुरवात झाली आहे. माजी मंत्री गणेश नाईक यांनीही शहरातील ५०० चौरस फुटापर्यंतच्या निवासी बांधकामांना मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव मांडण्याच्या सूचना महापौर जयवंत सुतार व पालिकेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. महापौरांनीही पुढील सभेमध्ये अशाप्रकारचा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. सर्वसाधारण सभेमध्ये आयुक्तांच्या माध्यमातून विकासकामांचे प्रस्ताव येत असतात. याशिवाय विविध पक्षांचे नगरसेवक अशासकीय ठराव मांडत असतात. मालमत्ता करमाफीचा प्रस्ताव आयुक्तांच्या माध्यमातून येणार की राष्ट्रवादीचे नगरसेवक अशासकीय ठराव मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने १८ वर्षांपासून मालमत्ता करामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. याच कालावधीमध्ये सैनिकांच्या मालमत्ता करातून सामान्य करामध्ये सूट देण्याचाही निर्णय घेतला आहे. यापूर्वी थकबाकीदारांसाठीही व्याज कमी करण्यासाठीचा ठराव मांडला होता. राष्ट्रवादी काँगे्रस येणाºया सभेमध्ये करमाफीचा प्रस्ताव मांडणार असून तो नक्की कसा असणार. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होणार की निवडणुकीसाठी गाजर ठरणार याविषयी आतापासूनच चर्चा तर्कवितर्क लढविले जात आहेत.