सिडको नोडमध्ये पाच फायरस्टेशनचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 12:25 AM2019-01-21T00:25:30+5:302019-01-21T00:25:35+5:30
सिडको नोडमधील फायरस्टेशन महापालिकेला हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
- अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : सिडको नोडमधील फायरस्टेशन महापालिकेला हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र आगामी काळात पुष्पकनगर आणि नैना क्षेत्रातील विहिघर, कोन, कोळखे, शिवकर याठिकाणी स्वतंत्र पाच फायरस्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार असल्याने आजूबाजूच्या परिसराचा सुनियोजित विकास करण्याकरिता नैनाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील गावांमध्ये नैना म्हणजे सिडको नोडल एजन्सी असणार आहे. त्यानुसार विकास आराखडा सुध्दा प्रसिध्द करण्यात आला आहे. या परिसरात अगोदरच इमारती उभ्या राहिल्या आहेतच त्याशिवाय आगामी काळात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होणार आहे. त्याकरिता सिडकोकडून पायाभूत सुविधा पुरवल्या जाणार आहे. भविष्यात नैना क्षेत्रात जर आग किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर मदत आणि बचाव कार्याकरिता अग्निशमनाची आवश्यकता आहे. ती गरज ओळखून नैनामध्ये चार फायरस्टेशन उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे.
सध्या सिडकोकडे असलेले नवीन पनवेल, कळंबोली आणि खारघर फायरस्टेशन आगामी काळात महापालिकेकडे जाणार आहेत. मात्र येथे काम करणारे मनुष्यबळ सिडकोकडेच राहणार असल्याने ते प्रस्तावित फायर स्टेशनमध्ये काम करतील. याबाबत सिडकोच्या अग्निशमन विभागाचे प्रशासक पी.बी. बोडखे यांच्याकडे विचारणा केली असता, नैना क्षेत्रात चार अग्निशमन केंदे्र प्रस्तावित आहेत. पुष्पकनगर येथे लवकरच अग्निशमन केंद्राच्या बांधकामाला सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले.
>पुष्पकनगरसाठी स्वतंत्र केंद्र
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधितांकरिता उभारण्यात येणाऱ्या पुष्पकनगरचा अतिशय सुनियोजित विकास करण्याचे काम सिडकोने हाती घेतले आहे. या ठिकाणी सुध्दा अग्निशमन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे बांधकाम परवानगी मिळाली आहे.