मनपा भवनाकरिता अडगळीचा प्रस्ताव , प्रशासनाने मागितली पर्यायी जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 02:12 AM2018-05-12T02:12:51+5:302018-05-12T02:12:51+5:30
पनवेल महानगरपालिका भवनाकरिता सिडकोने कर्नाळा स्पोटर््स अकादमीच्या बाजूला नाल्यालगत अडगळीची जागा देऊ केली आहे.
कळंबोली : पनवेल महानगरपालिका भवनाकरिता सिडकोने कर्नाळा स्पोटर््स अकादमीच्या बाजूला नाल्यालगत अडगळीची जागा देऊ केली आहे. मात्र याकरिता पर्याय भूखंड देण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने दिला आहे. महापौर निवासाकरिता सुध्दा याच परिसरात जागा देऊ केली असली तरी हे निवास मध्यवर्ती ठिकाणी असावे असा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
महापालिकेकडे सद्यस्थितीमध्ये मनुष्यबळ कमी असल्याने जागेची अडचण फारशी भासत नाही. परंतु आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर भविष्यात त्याकरिता प्रशस्त इमारतीची आवश्यकता भासणार आहे. त्या दृष्टिकोनातून कोणत्या ठिकाणी महापालिकेचे मुख्यालय असू शकते याबाबत सर्व्हे करण्यात आलेला आहे . त्यानुसार खांदा वसाहतीतील सर्कस मैदान, आसुडगाव बस आगारासमोर मोकळे मैदान आणि खांदेश्वर रेल्वेस्थानकालगतची मोकळी जागा महापालिका भवन उभारण्याकरिता मिळावी यासाठी सिडकोकडे सुरुवातीला आग्रह धरण्यात आला होता. तक्का येथील महापालिकेच्या जागेवर प्रस्तावित पनवेल महानगरपालिकेचे प्रशासकीय भवन असावे असा ठराव नगरपालिकेत झाला होता. परंतु ही जागा अपुरी पडेल तसेच येण्या-जाण्याच्या दृष्टीने सोईस्कर वाटत नाही हा मुद्दा पुढे आला. सिडको हद्दीतच महापालिका भवन असावे असा प्रस्ताव आहे. याकरिता प्रशस्त इमारत उभारण्यात यावी तिथे महापालिका आयुक्त व इतर अधिकाऱ्यांकरिता दालन, विविध विभागाकरिता स्वतंत्र बसण्याची व्यवस्था, सुविधा केंद्र, सभागृह, शौचालय, पिण्याचे पाण्याची सोय तसेच वाहने उभी करण्याकरिता पार्किंगची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव आहे. अत्याधुनिक स्वरूपाच्या सोयी-सुविधा या ठिकाणी विकसित करण्याबरोबरच लिफ्ट, सरकते जीने, सीसी कॅमेरे, वायफाय, अतिशय सुंदर स्वागत कक्षाची व्यवस्था असावी असे नियोजन आहे.नागरिकांनी प्रशासकीय भवन अतिशय सहनपणे गाठता येईल यादृष्टीने पाठपुरावा सुरू आहे.
सिडकोने कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीच्या बाजूला असलेल्या नाल्यालगत महापालिका भवनाकरिता जागा देऊ केली आहे. मात्र हा परिसर मध्यवर्ती नाही त्याचबरोबर जागा पुरेशी नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे. याशिवाय महापौर निवासाकरिताही कर्नाळा अकादमीजवळच सिडकोने जागा प्रस्तावित केली आहे. परंतु नागरिकांची गैरसोय होऊ नये त्यांना सहज भेटता यावे या गोष्टी विचारात घेऊन महापौर निवासाकरिता जागा द्यावी अशी मागणी सिडकोकडे करण्यात येणार आहे.
पनवेल महानगरपालिकेचे भवन उभारण्याकरिता सिडकोने कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीजवळ जागा देण्याचे कळविले आहे. त्याचबरोबर महापौर निवासासाठी सुध्दा याच भागात भूखंड सिडकोने देऊ केले आहे. मात्र आपण या दोनही इमारतींकरिता दुसरी जागा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. आयुक्त निवासाची जागा योग्य असून त्यादृष्टीने आपण त्यांना कळविले आहे.
- संजय कटेकर,
शहर अभियंता, पनवेल महानगरपालिका
आयुक्त निवास खारघरमध्ये
महापालिका आयुक्तांच्या निवासाकरिता खारघर सेक्टर २१ येथे जागा देण्यात येणार आहे.
त्याबाबत सिडकोकडून महापालिकेला कळविण्यात आले आहे.
प्रशासनाने याकरिता हिरवा कंदील दिला आहे. एकूण अर्धा एकर जागेवर इमारत उभारणार आहे.
लवकरच सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल.