नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरातील सायन-पनवेल महामार्गालगत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. गत आठवड्यात प्रस्तावात त्रुटी असल्याचे सांगून प्रस्ताव स्थगित केला होता. १३ कोटी वृक्ष लागवड सन २0१८-१९ अंतर्गत सायन-पनवेल महामार्गाच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करण्यासाठी स्थायी समिती सभेची मंजुरी घेण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव सादर केला होता.
वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी वृक्ष प्राधिकरणाच्या निधीमधून खर्च केले जाणार असून यासाठी आॅनलाइन निविदा मागविण्यात आल्या होत्या. या विषयावर चर्चा करताना सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी सायन-पनवेल महामार्ग महापालिकेकडे कधी हस्तांतरित होणार याबाबत विचारणा करीत यासाठी महापालिका प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नाची माहिती देण्याची मागणी केली. शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी सायन-पनवेल महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून काम पूर्ण झाल्यावर याबाबत शासन निर्णय घेणार असल्याचे सांगितले. नगरसेवक प्रकाश मोरे यांनी या महामार्गालगत डी. वाय. पाटील येथील सर्व्हिस रस्त्याच्या रस्त्यावरून वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असून या ठिकाणी वृक्षारोपण करू नये अशी सूचना मांडली. नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी वृक्षारोपण करण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी जागा आहेत त्या ठिकाणी वृक्षारोपण करावे ज्या जागा महापलिकडे हस्तांतरित झालेल्या नाहीत त्या ठिकाणी वृक्षारोपण करू नये असे सांगत डी. वाय. पाटील येथील सर्व्हिस रस्त्यावर व्हॅनची मोठी वर्दळ असते. या ठिकाणी महाविद्यालय, शाळा असून वाहने पार्किंगची देखील मोठी समस्या असून या ठिकाणी वृक्षारोपण न करण्याची मागणी केली. अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील यांनी या जागेबाबत महासभेत प्रस्ताव मंजूर असल्याचे सांगितले. त्यानंतर स्थायी समितीचे सभापती नवीन गवते यांनी सूचनांसह प्रस्ताव मंजूर केला.