महामार्गावर वृक्षलागवड करण्याचा प्रस्ताव स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 01:01 AM2019-06-08T01:01:18+5:302019-06-08T01:01:30+5:30
राष्ट्रवादीकडून सुधारित प्रस्तावाची सूचना
नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर वृक्षलागवड करण्याचा प्रस्ताव स्थगित करण्यात आला आहे. वृक्षलागवडीसाठीच्या जागेला राष्ट्रवादी काँगे्रसने विरोध केला आहे. सुधारित प्रस्ताव आणण्याची मागणी केली आहे.
महामार्गाच्या दोन्ही बाजूला तुर्भे ते उरण फाटा दरम्यान वृक्षलागवड करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यासाठी निविदा मागविण्यात आली होती. साडेतीन किलोमीटर लांबीच्या या रोडच्या दोन्ही बाजूला सहा हजार वृक्ष लावण्याचे प्रस्तावित केले होते.
एक वृक्षलागवड व संवर्धन करण्यासाठी ४६४ रुपये खर्च केले जाणार आहेत. ५७ लाख ४९ हजार रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडला होता. रवींद्र इथापे यांनी प्रस्तावित रोडवर जागेचा अभाव आहे. एमआयडीसीच्या बाजूला सर्व्हिस रोडचे काम महापालिका करणार आहे. यामुळे उरण फाटाऐवजी वाशीच्या दिशेने वृक्षलावगड करण्यात यावी. त्यासाठी सुधारणेसह प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना केली. महामार्ग हस्तांतर झालेला नसल्याचेही निदर्शनास आणून दिले. दिव्या गायकवाड यांनीही वाशीपर्यंत वृक्षलावगड करण्याची मागणी केली.
महापालिकेचे उपआयुक्त नितीन काळे यांनी या प्रस्तावाविषयी स्थायी समितीमध्ये माहिती दिली. रोडच्या दोन्ही बाजूला व पुलाखाली वृक्षलावगड केली जाणार आहे. वृृक्षलावगड करण्यासह पुढील तीन वर्षे संवर्धनाची जबाबदारी ठेकेदाराची असणार असल्याचेही सांगितले आहे; पण स्थायी समितीने हा प्रस्ताव स्थगित केला असल्यामुळे प्रशासन सुधारित प्रस्ताव आणणार का हे पुढील सभेत स्पष्ट होणार आहे.