बहुमजली वाहनतळाचा प्रस्ताव केला स्थगित; शिवसेनेचा स्थायी समितीत सभात्याग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 12:26 AM2019-12-14T00:26:29+5:302019-12-14T00:26:51+5:30
३० कोटी १६ लाख रुपये खर्च होणार असून, सुसीसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने सर्वात कमी किमतीची निविदा सादर केली होती
नवी मुंबई : सीबीडी बेलापूरमध्ये बहुमजली वाहनतळ विकसित करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने एक आठवडा स्थगित केला आहे. अभ्यासासाठी वेळ असल्याचे कारण सत्ताधाऱ्यांनी दिले आहे. शिवसेनेने सत्ताधाऱ्यांवर मनमानीचा आरोप करून सभात्याग केला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने बेलापूर सेक्टर १५ मधील भूखंड क्रमांक ३० येथे चारमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
तळमजल्यावर १२१ मोटारसायकल, ८७ चारचाकी वाहने, चार रॅम्प व कार्यालय प्रस्तावित केले आहेत. पहिल्या ते चौथ्या मजल्यावर एकूण ४०७ चारचाकी उभ्या करता येणार आहेत. ३० कोटी १६ लाख रुपये खर्च होणार असून, सुसीसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने सर्वात कमी किमतीची निविदा सादर केली होती; परंतु या कामासाठी निविदा भरलेल्या महावीर या ठेकेदारास पालिकेने अपात्र ठरविले होते. यामुळे ठेकेदाराने महापौरांना पत्र देऊन म्हणणे ऐकून घेण्याची मागणी केली होती. महापौरांनी हे प्रकरण प्रशासनाकडे पाठविले. प्रशासनाने संबंधितांची सुनावणी घेऊन ४० पानांचा अहवाल तयार केला असून तो स्थायी समितीमध्ये सादर केला.
स्थायी समितीमध्ये सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी अहवाल वाचण्यासाठी वेळ हवा असल्याचे कारण देऊन हा प्रस्ताव एक आठवडा स्थगित करण्याची सूचना केली. शिवसेना नगरसेवक रंगनाथ औटी यांनी याला आक्षेप घेतला. पात्र निविदाकाराला काम देण्याऐवजी कोणालातरी पाठीशी घालण्याचे काम सुरू असल्याचा आरोप केला व सत्ताधाºयांचा निषेध करून सभात्याग केला.