नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाच्या कामाने गती घेतली आहे. प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या घटकांचे पुनर्वसन व पुन:स्थापना करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नियोजित पुष्पकनगरच्या विकासावर अधिक भर देण्यात येत आहे. २२२ हेक्टर क्षेत्रफळावर उभारणारी ही वसाहत स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. त्यानुसार पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २0१८ पर्यंतची डेडलाइन देण्यात आली आहे.नवी मुंबई विमानतळ प्रकल्प २,२६८ हेक्टर जमिनीवर उभारला जाणार आहे. यातील ६७१ हेक्टर जमीन स्थानिकांकडून संपादित करण्यात आली आहे. या संपादित जमिनीच्या मोबदल्यात या भूधारकांना प्रस्तावित पुष्पकनगरमध्ये २२.५ टक्के विकसित भूखंड देण्यात आले आहेत. पुष्पकनगरमध्ये अत्याधुनिक दर्जाच्या सोयी-सुविधा पुरविण्याचा सिडकोचा मानस आहे. त्यानुसार १३९ मीटर रुंदीचे मल्टी मॉडेल कॉरिडोअर प्रस्तावित करण्यात आले आहे. या मल्टी मॉडेल कॉरिडोअरमध्ये एक्स्प्रेस वे, मेट्रो रेल्वे, बीआरटीएस,सर्विस रोड व बफर झोन आदी सुविधांचा समावेश असणार आहे. हा नोड खऱ्या अर्थाने स्वंयपूर्ण करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यानुसार विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्या भूखंड विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. तर पायाभूत सुविधा निर्माण करण्याची कामे डिसेंबर २0१८पर्यंत पूर्ण करण्याचे सिडकोचे उद्दिष्ट आहे. (प्रतिनिधी)
प्रस्तावित पुष्पकनगर होणार स्वयंपूर्ण वसाहत
By admin | Published: February 09, 2017 4:55 AM