गडकिल्ले, नाणी प्रदर्शन
By admin | Published: February 20, 2017 06:35 AM2017-02-20T06:35:35+5:302017-02-20T06:35:35+5:30
कोपरखैरणेतील ज्ञानविकास शाळेत शनिवारपासून गडकिल्ल्यांचे चित्रप्रदर्शन आणि शिवकालीन नाणी प्रदर्शनाला सुरुवात
नवी मुंबई : कोपरखैरणेतील ज्ञानविकास शाळेत शनिवारपासून गडकिल्ल्यांचे चित्रप्रदर्शन आणि शिवकालीन नाणी प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. ऐरोलीतील आपला कट्टा आणि श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी या प्रदर्शनाची सांगता झाली असून दोन दिवसांमध्ये तीन हजारांहून अधिक विद्यार्थी आणि पालकांनी भेट दिली.
या प्रदर्शनात महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातील किल्ले तसेच शिवकालीन नाणी पाहण्याची संधी मिळत आहे. शिवकालीन तलवारी, ढाल, कट्यार आदी शस्त्रांविषयीची माहिती तसेच शस्त्रप्रदर्शनाचे आयोजन याठिकाणी करण्यात आले आहे. नवी मुंबई शहरात ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या या प्रदर्शनाचे यंदाचे चौथे वर्ष असून पुस्तकातील इतिहासापेक्षा प्रत्यक्षात इतिहास कळावा याकरिता हे प्रदर्शन भरविल्याची माहिती आपला कट्टाचे सदस्य पंकज भोसले यांनी सांगितले. भारतीय टपाल विभागाने छत्रपती शिवाजी महाराजांवर काढलेली विशेष लिफाफे आणि टपाल तिकिटे देखील या प्रदर्शनात उपलब्ध आहेत. ज्या भागात प्रत्यक्ष भेट देऊन गडकिल्ले पाहता येणार नाही अशा ठिकाणी शिवशाहीच्या साथीदारांनी स्वत: काढलेले दुर्मीळ छायाचित्र हे या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरले.
शनिवार सकाळपासून परिसरातील शाळांमधील अनेक विद्यार्थी तसेच पालकांनी या प्रदर्शनाला भेट देत गड किल्ल्ल्यांमागचा इतिहास जाणून घेतला. दुर्ग संवर्धनाचा मोलाचा संदेश या माध्यमातून दिला जात असून ऐतिहासिक ठेवा जपण्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ज्ञानविकास विद्यालयाचे संस्थापक अॅड. पी.सी. पाटील, संचालिका जयश्री पाटील, आपला कट्टाच्या अध्यक्ष ममता भोसले, उपाध्यक्ष मोहन हिंदळेकर, सचिव दीपक देसाई, पंकज भोसले, सिध्देश गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.