कळंबोलीमधील लॉजमध्ये वेश्याव्यवसाय; पोलिसांची धाड, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल
By नामदेव मोरे | Published: September 9, 2023 05:37 PM2023-09-09T17:37:36+5:302023-09-09T17:37:49+5:30
कळंबोली सेक्टर १४ मधील गुडविल लॉजिंग ॲण्ड बोर्डींगमध्ये पोलिसांनी छापा टाकला.
नवी मुंबई: कळंबोली सेक्टर १४ मधील गुडविल लॉजिंग ॲण्ड बोर्डींगमध्ये पोलिसांनी छापा टाकला. लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले असून या प्रकरणी व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाच्या अधिकाऱ्यांना गुडविल लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ८ सप्टेंबरला लॉजवर कारवाई करण्यासाठी सापळा रचला.
बनावट ग्राहकास पाठविले असता व्यवस्थापकाने काही मुलींचे फोटो दाखविले. यामधील एक मुलगी पसंत असल्याचे ग्राहकाने सांगितल्यानंतर अडीच हजार रुपये मोबदला घेऊन त्या मुलीला बोलावण्यात आले. लॉजमध्ये वेश्याव्यवसाय होत असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी छापा टाकला. दोन मुली तेथे आढळून आल्या. त्यांची विचारपूस केली असताना त्यांच्याकडून कशाप्रकारे वेश्याव्यवसाय करून घेतला जातो याची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापक अमितकुमार द्विवेदी याच्या विरोधात कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.