अल्पवयीन मुलींच्या नावाखाली वेश्याव्यवसाय
By सूर्यकांत वाघमारे | Published: August 4, 2023 08:05 PM2023-08-04T20:05:47+5:302023-08-04T20:06:16+5:30
दलाल महिलेसह रिक्षाचालकाला अटक : धमकावून मुलींना ढकलले देहविक्रीत
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : अल्पवयीन मुलींच्या नावे चालणाऱ्या देहविक्रीच्या रॅकेटचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. याप्रकरणी दलाल महिलेसह रिक्षा चालकाला अटक केली आहे. ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवून त्या अल्पवयीन असल्याचे सांगून एका मुलीसाठी ८ हजार रुपये आकारले जात होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी बनावट ग्राहकांमार्फत रॅकेट उघड करून २० वर्षीय दोन मुलींची सुटका केली आहे.
नेरुळ परिसरात एक महिला दोन अल्पवयीन मुलींकडून देहविक्री करून घेत असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक अतुल आहेर यांनी सहायक निरीक्षक नीलम पवार यांचे पथक केले होते. या पथकाने बनावट ग्राहक तयार करून त्या महिलेला संपर्क साधला होता. त्यावेळी सदर महिलेने ग्राहकाला दोन मुलींचे फोटो पाठवून त्या अल्पवयीन असून एका मुलीचे ८ हजार रुपये सांगितले होते. त्यानुसार ग्राहकाने होणार दिला असता गुरुवारी सीबीडी येथे दोन मुलींना रिक्षातून पाठवण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी दोन मुली व रिक्षाचालकाला ताब्यात घेतले असता, त्या दोन्ही मुलींचे वय २० वर्ष असल्याचे समोर आले. त्यांनी दलाल महिला कल्पना कोळी हि धमकावून आपल्याकडून व इतर मुलींकडून देहविक्री करून घेऊन त्यांना दोन हजार रुपये देत असल्याची कबुली दिली.
त्यानुसार रिक्षा चालक सुमित गुप्ता याच्या मदतीने पोलिसांनी कुकशेत गावातून कल्पना कोळी हिला पोलिसांनी अटक केली आहे. त्या दोघांवर सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९, २० वर्षाच्या मुलींना अल्पवयीन असल्याचे भासवून ती त्यांना ज्यास्त दलाली घेऊन ग्राहकांकडे पाठवत असे. यासाठी तिने इतरही मुलींना गळाला लावले आहे का याचा अधिक तपास गुन्हे शाखा पोलिस करत आहेत.