रक्षाबंधन निमित्ताने स्वच्छता मोहिमेतून खारफुटीचे रक्षण
By योगेश पिंगळे | Published: August 30, 2023 06:46 PM2023-08-30T18:46:48+5:302023-08-30T18:47:19+5:30
गोळा केलेल्या कचऱ्यातून साकारली राखीची प्रतिकृती
नवी मुंबई : नैसर्गिक आपत्तीतून शहराच्या संरक्षणासाठी खारफुटी महत्वाची असून इनरव्हील क्लब ऑफ नवी मुंबई संगिनी सेंच्युरियनच्या सहकार्याने एन्व्हायर्नमेंट लाइफ फाऊंडेशनच्या मॅंग्रोव्ह सोल्जर्सतर्फे रक्षाबंधन निमित्ताने खारफुटीच्या रक्षणासाठी खाडीकिनारी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. गोळा केलेल्या कचऱ्यातून राखीची प्रतिकृती साकारत खारफुटीच्या रक्षणाची प्रतिज्ञा करण्यात आली.
नवी मुंबई शहर खाडीकिनारी वसलेले असून या खाडीकिनारी मोठ्या प्रमाणावर असलेलाई खारफुटी हि नैसर्गिक आपत्तीतून शहराच्या संरक्षणासाठी महत्वाची आहे. या खाडी किनारी मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असून यामुळे खारफुटीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. एन्व्हायर्नमेंट लाइफ फाऊंडेशनच्या माध्यमातून वर्षभर सातत्याने शहरातील खाडी किनारी स्वच्छता मोहीम राबविली जाते. विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून खाडीकिनारी पडलेला कचरा गोळा केला जातो.
रक्षा बंधनानिमित्ताने स्वच्छतेचा १५८ वा आठवडा मोहीम राबविण्यात आली. खारफुटीच्या मुळांपासून गोळा केलेल्या कचऱ्याची सजावट करून राखीची प्रतिकृती तयार करण्यात आली व यावेळी खारफुटीच्या रक्षेचे बंधन घालण्यात आले. पर्यावरणाचे रक्षण महत्वाचे आहे. खाडी किनारी साचलेला कचरा खारफुटीसाठी धोकादायक असून जलचर आणि सागरी जीवांना देखील यामुळे हानी पोहोचते त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आवाहन धर्मेश बराई यांनी यावेळी केले.