अतिक्रमण रोखण्यासाठी जुहूगाव येथील ट्री बेल्टला संरक्षण भिंत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 10:49 PM2019-07-06T22:49:44+5:302019-07-06T22:50:13+5:30
वाशीतील जुहूगाव सेक्टर ११ येथील ट्री बेल्ट खुला असल्याने या ठिकाणी अतिक्र मण होत असून या भागात डेब्रिज आणि कचरा टाकला जातो.
नवी मुंबई : जुहूगाव सेक्टर ११ येथील स्वामी नारायण मंदिर ते जुहूगाव स्मशानभूमी दरम्यानचा ट्री बेल्ट खुला असल्याने या ठिकाणी अतिक्र मण होत असून डेब्रिज टाकले जाते त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून ट्री बेल्टला संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. सदर प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली असून शहरातील अपूर्ण संरक्षक भिंतींची कामे पूर्ण करण्याचे आदेश सभापतींनी प्रशासनाला दिले आहेत.
वाशीतील जुहूगाव सेक्टर ११ येथील ट्री बेल्ट खुला असल्याने या ठिकाणी अतिक्र मण होत असून या भागात डेब्रिज आणि कचरा टाकला जातो. त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरलेली असते. परिसर स्वच्छ आणि सुरक्षित राहावा यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सदर परिसरात संरक्षक कुंपण बांधण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने शनिवारी झालेल्या स्थायी समिती सभेत मंजुरीसाठी मांडला होता यावर चर्चा करताना नगरसेवक सुनील पाटील यांनी नेरु ळ पोलीस ठाण्याजवळील मोठ्या संरक्षण भिंतीला तडा गेला असून या भिंतीच्या शेजारीच शाळा आहे त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने सदर भिंतीचे काम महापालिकेने करावे, अन्यथा नगरसेवक निधीचा वापर करून करण्यात यावे अशी मागणी केली.
नगरसेवक डॉ. जयाजी नाथ यांनी गेल्यावर्षी पावसाळ्यात सीबीडी येथील डोंगराची माती मोठ्या प्रमाणावर वाहून आली होती त्यामुळे वित्तहानी झाली होती. महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी अत्यावश्यक सुविधा देण्याच्या दृष्टीने संरक्षक भिंतीचे काम सुरु करण्यात आले होते, परंतु काम अर्धवट ठेवण्यात आले असल्याचे नाथ यांनी सांगितले. स्थायी समितीचे सभापती नवीन गवते यांनी दिघा भागात देखील संरक्षण भिंतींचा मोठा प्रश्न आहे.
शहरात अनेक ठिकाणच्या भिंतींचे काम अपूर्ण असून ते पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील यांनी अपूर्ण असलेल्या भिंतींची पाहणी करून कामे पूर्ण केली जातील. तसेच नेरु ळ पोलीस ठाण्यालगतच्या भिंतीची पाहणी करून पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर सदर प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.