पनवेल : सागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी आता सुरक्षारक्षकांचे बळ घेण्यात आले आहे. याकरिता रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाकडून ६० प्रशिक्षित सुरक्षारक्षक पुरविण्यात आले आहेत. २० ठिकाणी हे गार्ड गेल्या महिन्यापासून कर्तव्य बजावत आहेत. त्यांना राज्याच्या मत्स्यालय विभागाकडून हे वेतन देण्यात येणार आहे. रायगड सुरक्षारक्षक मंडळ या माध्यमातून पोलीस, गुप्तवार्ता, कोस्टल बोर्ड या विभागांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करीत असून, सुरक्षिततेची मोठी जबाबदारी स्वीकारली आहे.१९९३ ला मुंबईत जो बॉम्बस्फोट झाला होता, त्यावेळी श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी समुद्रकिनारी आरडीएक्स उतरविले होते. तसेच २६/११चे दहशतवादी समुद्रमार्गानेच आले होते. त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने सागरी सुरक्षितेतवर अधिक भर देण्यास सुरुवात केली आहे.रायगड जिल्हा हा मुंबईपासून जवळ असून भौगोलिक स्थान असलेला महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. समुद्रमार्गे हे अंतर अवघे १८ किलोमीटर इतके आहे. त्यामुळे रायगडच्या सागरी सुरक्षेकरिता मोठा फौजफाटा वापरण्यात येत आहे. अडीच हजार मनुष्यबळ या ठिकाणी पहारा देत आहे. त्यांच्या मदतीसाठी १ सप्टेंबरपासून सागरी सुरक्षारक्षक काम करीत आहेत. रायगड जिल्ह्यातील जो काही सागरी भाग आहे, त्यामध्ये २० ठिकाणे अतिसंवेदनशील आहेत. तिथे सुरक्षा देण्याकरिता तारापूरवाला मत्स्यालय आयुक्त कार्यालयाने सुरक्षारक्षक मंडळाच्या सुरक्षारक्षकांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाला प्रस्ताव दिला. त्यानंतर चेअरमन श्याम जोशी यांनी पुढाकार घेऊन ६० सुरक्षारक्षकांची फळी तयार केली. मत्स्य विभागाने आमच्याकडे गार्डची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना ६० गार्ड आम्ही गेल्या महिन्यात दिले आहेत. या ठिकाणी काम करणे अतिशय आव्हानात्मक आहे, ती जबाबदारी आमचे गार्ड नक्की पार पाडतील. येणाऱ्या-जाणाऱ्या बोटींची नोंद ठेवणे, संशयास्पद बाब आढळल्यास त्वरित पोलिसांना कळविणे यासारखी कामे सुरक्षारक्षकांना दिली आहेत.-श्याम जोशी, चेअरमन, रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ एका लॅण्डिंग पॉइंटवर तीन याप्रमाणे येथे एकूण ६० सुरक्षारक्षक पुरविण्यात आले आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता पाच पर्यवेक्षकसुद्धा तैनात केले आहेत. सुरक्षारक्षकांना वेतन, भत्ते मिळून १३,२२२; पर्यवेक्षकांना १४,१०० रु पयांचे वेतन मत्स्य आयुक्तालयाकडून देण्यात येणार आहे.
सागरी सुरक्षेला सुरक्षारक्षकांचे बळ
By admin | Published: October 17, 2015 2:06 AM