केेंद्राच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 01:01 AM2020-11-27T01:01:42+5:302020-11-27T01:01:59+5:30
इंटकची निदर्शने : कामगारविरोधी कायदे रद्द करण्याची मागणी
नवी मुंबई : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांविराेधात नवी मुंबई इंटकच्या वतीने निषेध करण्यात आला. महानगरपालिका रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र व एमआयडीसीमध्येही केंद्र सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली शहरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले.
वाशीतील महानगरपालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात कामगारांनी निदर्शने केली. ‘रद्द करा, रद्द करा, कामगारविरोधी कायदे रद्द करा’ अशा घोषणा केल्या. या वेळी वाशी रुग्णालय वॉर्ड बॉय संघटनेचे अध्यक्ष सुहास म्हात्रे, बहुउद्देशीय सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष कमलेश आठवले, इंटक प्रणीत माथाडी संघटनेचे नेते दिनेश गवळी, कुणाल खैरे, मनीष महापुरे, संग्राम इंगळे उपस्थित होते. या वेळी निदर्शनांचा त्रास रुग्णालयातील रुग्णांना होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. सानपाडा नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनीही निदर्शने केली. केंद्र शासनाच्या नवीन कायद्यामुळे कामगारांचे प्रचंड नुकसान होणार आहे. कामगार देशाेधडीला लागणार आहेत. कामगारविरोधी कायदे रद्द करावेत, अशी भूमिका रवींद्र सावंत यांनी मांडली.
कोकण भवनमधील कर्मचाऱ्यांचा संप
नवी मुंबई : कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपामध्ये कोकण भवनमधील कर्मचारीही सहभागी झाले होते. जुनी पेंशन योजना सुरू करण्यात यावी. कंत्राटीकरण रद्द करून कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावे व इतर प्रश्न सोडविण्याची मागणी केली. बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र विक्रीकर कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनां संपात सहभागी झाल्याने गुरूवारी दिवसभर कोकण भवनमधील कामकाजावर परिणाम झाला होता.