वाशीतील रुग्णालयावरील हल्ल्याचा निषेध, कडक कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 12:56 AM2020-10-29T00:56:03+5:302020-10-29T00:56:36+5:30
Navi Mumbai News : कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्याऐवजी त्यांना मारहाण केली जाणार असेल, तर काम करायचे कसे, असा प्रश्न डॉक्टर्ससह इतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला असून, हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे
नवी मुंबई - महानगरपालिकेच्या वाशीतील कोरोना रुग्णालयातील हल्याचा सर्व स्तरांतून निषेध होत आहे. २२९ दिवस डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचारी कोरोनाग्रस्तांची सेवा करत आहेत. कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्याऐवजी त्यांना मारहाण केली जाणार असेल, तर काम करायचे कसे, असा प्रश्न डॉक्टर्ससह इतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला असून, हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नवी मुंबईमध्ये १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. तेव्हापासून कोरोनामुक्त शहर करण्यासाठी आरोग्य यंत्रणा दिवस-रात्र काम करत आहे. मनुष्यबळ कमी असतानाही प्रत्येक रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मनपा व खासगी रुग्णालयांमधून आतापर्यंत ४३,८६९ रुणांना सेवा देण्यात आली आहे. तब्बल ४०,९५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के झाले आहे. मृत्युदर साडेतीन टक्क्यांवरून दोन टक्क्यांवर आला आहे. रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण १८६ दिवसांवर पोहोचले आहे. आरोग्यसेवकांनी केलेल्या परिश्रमांमुळे हे शक्य झाले आहे. अनेक डॉक्टर्स व इतर कर्मचारी सुट्टी न घेता काम करत आहेत, परंतु बुधवारी पहाटे वाशी रुग्णालयात झालेल्या हल्ल्यामुळे आरोग्यसेवकांना धक्का बसला आहे. काहीही दोष नसताना डेडिकेटेड कोविड रुग्णालयात तोडफोड करण्यात आली. आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. कामबंद आंदोलन करण्याची मानसिकताही काही कर्मचाऱ्यांची झाली होती, परंतु उपचार घेणाऱ्या रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आंदोलन केेले नाही.
कर्मचारी संघटना व आरोग्य सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दाल निषेध केला आहे. जर कोणाला उपचाराविषयी आक्षेप असतील किंवा काही त्रुटी असतील, तर त्याविषयी सनदशीर मार्गाने तक्रार नोंदविता येते. आंदोलनही करता येते, परंतु तोडफोड करणे योग्य नाही. या प्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात
आहे.
महानगरपालिका रुग्णालयातील हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी आम्ही पोलिसांकडे करणार आहोत. या प्रकरणाचा संघटनेच्या वतीने पाठपुरावा करणार आहोत.
- मंगेश लाड, सरचिटणीस,
समाज समता संघटना
महानगरपालिकेचे डॉक्टर्स व सर्व आरोग्यसेवक दिवस-रात्र कोरोना रुग्णांना सेवा देत आहेत. त्यांच्यावरील हल्ल्याचा आम्ही निषध करत आहोत. या प्रकरणी दोषींना कडक शासन झालेच पाहिजे.
-रमाकांत पाटील, कार्याध्यक्ष,
नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन