नवी मुंबई भाजपाचे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन
By कमलाकर कांबळे | Published: May 30, 2024 02:30 PM2024-05-30T14:30:17+5:302024-05-30T14:32:06+5:30
गुन्हा दाखल करून अटक करा, अशी मागणी करण्यात आली.
कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेले पोस्टर पाडल्याच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी आव्हाड यांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनामध्ये माजी महापौर सागर नाईक यांच्यासह सतीश निकम, संपत शेवाळे, नवीन गवते, विविध मोर्चाचे प्रमुख, लोकप्रतिनिधी, भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोणत्याही गोष्टीची स्टंटबाजी करणे ही आव्हाड यांची जुनी सवय आहे. आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी महामानवाचा अपमान करणाऱ्या आव्हाडांच्या कृतीचा संपूर्ण महाराष्ट्र निषेध करतो आहे, असा हल्लाबोल जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केला.
तर आव्हाड यांचे विचार सकारात्मक नसून नकारात्मक आहेत. त्याच्यात राजकीय स्वार्थ दिसून येतो, अशी टीका नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी केली. याप्रसंगी नवी मुंबई भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष राजू शिंदे , नवी मुंबई भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित मेढकर यांनीही आव्हाड यांच्या कृत्याचा निषेध करीत कारवाईची मागणी केली.