पाळणाघराच्या उदघाटनाचा पाळणा हलेना मनसेतर्फे आंदोलन : प्रशासनाला दिली महिन्याची मुदत
By सूर्यकांत वाघमारे | Published: November 6, 2023 04:34 PM2023-11-06T16:34:26+5:302023-11-06T16:34:33+5:30
पाळणाघराची वास्तू तयार होऊनही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे उदघाटन रखडले आहे.
नवी मुंबई : पाळणाघराची वास्तू तयार होऊनही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे उदघाटन रखडले आहे. याच्या निषेधार्थ मनसेतर्फे पाळणाघराबाहेर आंदोलन करून पाळणा हलवला. यावेळी पालिकेने महिन्याभरात प्रत्यक्षात पाळणाघर वापरासाठी खुले न केल्यास आक्रमक आंदोलन केले जाईल असा इशारा मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी प्रशासनाला दिला.
महापालिकेने सीवूड येथे पाळणाघराची इमारत उभारली आहे. मात्र काम पूर्ण होऊन देखील अद्याप पर्यंत इमारतीचे उदघाटन करण्यात आलेले नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्चून उभारलेली इमारत वापराविना पडून आहे. याबाबत मनसेने अनेकदा पालिकेकडे पाठपुरावा केला आहे. त्यानंतरही प्रशासन गांभीर्य घेत नसल्याने सोमवारी पाळणा घराबाहेर पाळणा हलवून आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसे नेत्या शालिनी ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.
आंदोलनानंतर त्यांनी पालिका उपायुक्तांची देखील भेट घेऊन प्रशासनाला धारेवर धरले. वास्तू उभारून देखील त्या लोकांच्या उपयोगी येत नसल्यास, त्यांचा उपयोग काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे एक महिन्यात प्रशासनाने हे पाळणाघर नागरिकांच्या वापरासाठी खुले करावे असा इशारा दिला आहे. अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल असाही इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. याप्रसंगी महिला शहर अध्यक्ष आरती धुमाळ, सविनय म्हात्रे, सचिन कदम, अमोल आयवळे, उमेश गायकवाड, अप्पासाहेब जाधव आदी उपस्थित होते.