सिडको भवनसमोर प्रकल्पग्रस्तांचे जीवनत्याग आंदोलन
By नामदेव मोरे | Published: November 21, 2023 05:34 PM2023-11-21T17:34:59+5:302023-11-21T17:37:17+5:30
नैना प्रकल्पाला विरोध, पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात.
नवी मुंबई : नैना प्रकल्पाला विरोध करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी सिडको भवन समोर आंदोलन केले. आंदोलकांनी इमारतीवर जावून उडी मारण्याचा इशारा दिला होता. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतल्यामुळे पुढील दुर्घटना टळली.
नैना व इतर प्रकल्पग्रस्त समितीच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा सुरू करण्यात आला आहे. या समितीने नेना प्रकल्प रद्द करण्याची मागणीही केली आहे. गावठाण विस्तार योजना तत्काळ राबविण्यात यावी. गरजेपोटी बांधलेली घरे नियमीत करावी अशी मागणीही केली आहे. गावठाण विस्तार योजना राबविण्याचे आश्वासन सिडकोने दिले होते. परंतु प्रत्यक्षात कार्यवाही केली नसल्यामुळे संघटनेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर, अनिल ढवळे व इतर पदाधिकाऱ्यांनी सिडकोभवनसमोर आंदोलन केले. ढवळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवनयात्रा संपविण्याचा इशारा दिला होता. इमारतीवरून उडी मारून जीवन संपविण्याचा इशारा दिल्यामुळे पोलिसांनी वेळेत आंदोलकांना ताब्यात घेतले.
संघटनेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी सांगितले की नैना प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. हा प्रकल्प रद्द करण्यात यावा. यासाठी शेतकऱ्यांच्या जमीनी मोफत घेतल्या जात आहेत. शेतकऱ्यांना देशोधडीला लावले जात आहे. यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. गावठाण विस्तार योजना, गरजेपोटी बांधलेली घरे याविषयीचे आश्वासन सिडकोने पाळले नसल्यामुळे सहकाऱ्यांनी जीवनयात्रा संपविण्याचा इशारा दिला होता असेही स्पष्ट केले.