पनवेल : नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम करताना सर्वच नियम पायदळी तुडवले जात असल्याने ओवळा ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना याचा मोठा त्रास होत आहे. याविरोधात शुक्र वारी हजारो रहिवाशांनी एकत्र येऊन केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निषेध मोर्चा काढला होता.मोर्चात ग्रामपंचायत ओवळे हद्दीतील वरचे ओवळे, ओवळे, वाघिवली वाडी येथील प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी १० वाजता ओवळे फाटा याठिकाणी एकत्रित येऊन सिडको, तसेच कंत्राटदाराविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. विमानतळाच्या कामामुळे होणारा त्रासाचा उद्रेक या निषेध मोर्चाच्या माध्यमातून स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला. मोर्चात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. विमानतळाच्या कामाला सुरुवात झाल्यापासून येथील ग्रामस्थ विविध समस्यांना तोंड देत आहेत. यामध्ये उलवे टेकडीच्या सपाटीकरणासाठी केली जाणारी अतितीव्र ब्लास्टिंग ग्रामपंचायतीच्या नियंत्रणात ठेवण्यात यावी, ब्लास्टिंगमुळे नुकसान झालेल्या घरांना भरपाई देण्यात यावी, विमानतळाच्या कामादरम्यान प्रदूषणाचे नियम पायदळी तुडवत असल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, गरजेपोटी घरांचा प्रश्न, उलवे नदीच्या बदललेल्या पात्रामुळे उद्भवणाऱ्या समस्यांचे निवारण, रात्री होणारे उत्खनन व वाहतूक यांच्यावर बंदी घालण्यात यावी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नोकरभरतीत प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्यात यावे आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या आहेत. निषेध मोर्चाची दखल घेऊन सिडको अधिकाºयांनी मोर्चेकºयांची भेट घेतली. या समस्यांच्या निवारणासाठी बुधवारी सिडको भवनामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ओवळे ग्रामपंचायतीच्या सरपंच रेश्मा अमित मुंगाजी यांनी दिली. या बैठकीत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.
विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा निषेध मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:10 AM