नवी मुंबई: आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातून आलेल्या लाखो नागरिकांच्या मदतीला नवी मुंबईमधील सकल मराठा समाजाने स्वयंसेवकांची फळी तयार केली होती. आंदोलकांच्या राहण्याची व जेवणाची उत्तम सोय करण्यात आली. या आदातिथ्याने आंदोलकांनी समाधान व्यक्त केले. आरक्षणाच्या लढ्यात नवी मुंबईकरांनी केलेले सहकार्य कायम लक्षात राहील अशी भुमीका अनेकांनी व्यक्त केली आहे.
मुंबईच्या वेशीवर असलेल्या नवी मुंबईमध्ये २५ जानेवारीला आंदोलक मुक्कामाला आहे. हजारो वाहने व लाखो नागरिकांची सोय कुठे करायची हा गंभीर प्रश्न होता. परंतु मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने पाचही मार्केट उपलब्ध करून दिल्यामुळे पार्किंगचा व आंदोलकांच्या राहण्याचा प्रश्न क्षणात मिटला. शहरातील प्रत्येक विभागातील सकल मराठा समाजाने चार भाकरी प्रेमाची उपक्रम राबविला. घराघरातून भाकरी,चटणी, ठेचा संकलीत करण्यात आला. चार लाख पेक्षा जास्त भाकरी संकलीत झाल्या होत्या. बदलापूरवरून ५० हजार भाकरी आंदोलकांसाठी तेथील मराठा समाजाने पाठविल्या होत्या.
आंदोलकांना गुरूवारी दुपारपासून जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. रात्रीचे जेवण, सकाळी नाष्टा व पुन्हा दुपारचे जेवण देण्यात आले. पिण्याच्या बॉटेल ठिकठिकाणी वितरीत केल्या जात होत्या. याशिवाय बिस्कीटे व इतर खाद्यपदार्थ पुरविण्याची सोय केली होती. रात्रभर पामबीच रोडवर करावे, नेरूळ, सारसोळे, सानपाडा वाशी सेक्टर १७ मध्ये शेकडो नवी मुंबईकर आंदोलकांच्या स्वागतासाठी उभे राहिले होते.
अंतरवाली सराटीपासून आंदोलनात ठिकठिकाणी जेवणाची व राहण्याची सोय केली होती. पण नवी मुंबईकरांनी सर्वात उत्तम सोय केली. राहण्यासाठी व वाहने उभी करण्यासाठी सुरक्षीत जागा होती. आरक्षणाच्या लढ्यात शहरवासीयांचे योगदान विसरता येणार नाही. - दिगंबर शिंदे, परभणी नवी मुंबईमधील सकल मराठा समाजाने दाखविलेली एकजूट अभिमानास्पद आहे. येथे दोन दिवस कोणतीही गैरसोय झाली नाही. जेवणासाठीही भाकरी, भाजी, भात, सलॅड, शिरा अशी सोय केली होती. - संदीप शेडगे, आंदोलक