नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणासाठी पालिका मुख्यालयासमोर धडकणार आंदोलक; वाहतुकीत बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 08:03 AM2021-06-24T08:03:06+5:302021-06-24T08:12:36+5:30
Navi Mumbai : आज नेरुळ ते बेलापूर दरम्यानचा पामबीच मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. नेरुळ येथून केवळ आंदोलकांच्या गाड्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
नवी मुंबई - विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज निघणाऱ्या मोर्चाला पोलीसांनी पामबीच मार्गावर पालिका मुख्यालयासमोरील जागा दिली आहे. त्यामुळे पामबीच मार्गावर नेरुळ ते. बेलापूर दरम्यान आंदोलक जमणार आहेत. यासाठी पामबीच मार्गावरील वाहतुकीत देखील बदल करण्यात आले आहेत.
आज नेरुळ ते बेलापूर दरम्यानचा पामबीच मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. नेरुळ येथून केवळ आंदोलकांच्या गाड्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. ही वाहने करावे गावापर्यंत जाऊ शकणार असून त्याठिकाणी त्यांच्या पार्किंगची व्यवस्था आंदोलनाच्या संयोजकांमार्फत करण्यात आलेली आहे. तर पामबीच मार्गे जाणारी इतर खासगी वाहने नेरुळ येथून राजीव गांधी पूल मार्गे एल. पी. पुलाकडे वळवली जाणार आहेत.
या आंदोलनात नवी मुंबईसह पनवेल, उरण, कल्याण डोंबिवली, पालघर आदी परिसरातून 50 हजाराहून अधिक आंदोलक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यांच्या वाहनांमुळे आज नवी मुंबईत जागोजागी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आवश्यक ठिकाणी वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त देखील नेमण्यात आला आहे.पालिका मुख्यालयासमोर धडकणार आंदोलक
पामबीच मार्गावरील वाहतुकीत बदल